सावंतवाडीत भरधाव अल्टो कारच्या धडकेत एक्टिवास्वार वृद्ध जखमी

चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासमोर रस्त्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या मारुती अल्टो कारने धडक दिल्याने एक्टिवास्वार ७६ वर्षीय वृद्ध जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजाराम लक्ष्मण गवस (वय ७६, रा. माजगाव फॉरेस्ट कॉलनी, न्यू गरड, ता. सावंतवाडी) हे शुक्रवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास आपली होंडा एक्टिवा (एमएच ०७ एई ४५२६) गाडीवरून माजगावहून सावंतवाडीच्या दिशेने जात होते. त्या वेळी चिटणीस नाक्याकडून सावंतवाडी जेलच्या दिशेने जाणाऱ्या मारुती अल्टो कारवरील अज्ञात चालकाने आपले वाहन अविचाराने, हयगईने व भरधाव वेगात चालवून गवस यांच्या एक्टिवाला समोरून धडक दिली.

या अपघातात फिर्यादी राजाराम गवस यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्या गाडीचेही नुकसान झाले आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शिंगाडे करत आहेत.