खेड (प्रतिनिधी) :- खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात मकर संक्रांतीनिमित्त पारंपरिक हळदीकुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने पार पडला. वर्षाच्या पहिल्याच महिन्यात येणारा मराठमोळा सण मकर संक्रांत महाराष्ट्रासह देशभरात आनंदाने साजरा केला जातो. या सणाचे विशेष म्हणजे महिलांसाठी हळदीकुंकवाचे आयोजन, ज्यामध्ये परंपरा, श्रद्धा आणि आपुलकी यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो.
आपल्याला पूर्वजांकडून लाभलेला संस्कारांचा वसा जतन करत, कोणतेही बदल न करता पारंपरिक पद्धतीने सण साजरे करणे हीच खरी परंपरा असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. आधुनिकतेच्या नावाखाली सणांचे स्वरूप बदलण्याऐवजी, आपल्या संस्कृतीचे मूळ जपणे आवश्यक असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. खेड शहरातील स्वामींच्या मंदिरात महिला मंडळाच्या वतीने गेली अनेक वर्षे सातत्याने हळदीकुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. यंदाही सालाबादप्रमाणे आलेल्या महिलांचे मनोभावे स्वागत करण्यात आले. प्रत्येक महिलेला हळदीकुंकू व वाण देऊन सन्मानपूर्वक पाठवणी करण्यात आली. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने असेच सण-वार आमच्याकडून अखंडपणे साजरे होत राहावेत, अशी भावना खेड नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका नीता आंब्रे यांनी व्यक्त केले.
हिंदू धर्मात हळदी आणि कुंकू यांना विशेष पवित्र स्थान आहे. सौभाग्य, समृद्धी आणि मंगलतेचे प्रतीक म्हणून हळदीकुंकवाला महत्त्व दिले जाते. याच पार्श्वभूमीवर बोलताना नगरसेविका नीता आंब्रे यांनी आपल्या यशाच्या प्रवासात पतींचे योगदान अधोरेखित केले. नगरसेविका होण्याच्या प्रवासात पती हेच खरे सखा आणि सारथी असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक टप्प्यावर त्यांनी दिलेले सहकार्य आणि पाठबळ यामुळेच आजपर्यंतचा प्रवास यशस्वी झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला सौ. वैशाली दरेकर, नगरसेविका नीता आंब्रे, स्मिता धारिया, आरती खेडेकर, रश्मी सोनी, मृण्मयी सकपाळ, रश्मी भालेकर, संजोत कोळवणकर, लीना खेडेकर, शर्मिला निकम, पूजा सकपाळ, संध्या सकपाळ, अमृता गायकवाड यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पारंपरिक वातावरणात, भक्तीभावाने आणि आनंदाच्या माहोलात हा हळदीकुंकवाचा सोहळा संपन्न झाला.











