आंबोलीचे नाव जगभरात करणाऱ्या गोविंद गावडेचा सरपंचांनी केला सन्मान 

आंबोलीचे नाव जगभरात करणाऱ्या गोविंद गावडेचा सरपंचांनी केला सन्मान

 

शिवतांडव स्तोत्रावर सलग आठ तास तबलावादनाने केला विश्वविक्रम

 

सावंतवाडी । प्रतिनिधी : आंबोलीतील रहिवासी, तरुण तबला वादक कु. गोविंद बाबुराव गावडे याने आशिया पॅसिफिक ग्लोबल रेकॉर्डमध्ये (२२७ देशांचा समावेश) सलग आठ तास पंचवीस मिनिटे शिव-तांडव स्तोत्रावर तबला वादन करून एक नवा विश्वविक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. या अभूतपूर्व कामगिरीमुळे त्याने केवळ आंबोलीच नाही, तर संपूर्ण सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्राचे नाव जागतिक पातळीवर उंचावले आहे.

गोविंदच्या या यशाबद्दल आंबोलीच्या सरपंच सौ. सावित्री पालेकर यांनी त्याचे विशेष अभिनंदन केले असून, या विक्रमामुळे आंबोलीचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्याबद्दल आभार मानले आहेत.

*यशामागे कठोर परिश्रम आणि मार्गदर्शन*

गोविंद गावडे सध्या कोल्हापूर येथे शिक्षण घेत आहे, तर त्याचे वडील मेनेन अँड मेनेन कंपनीत कार्यरत आहेत. या विक्रमामागे गोविंदची मेहनत तर आहेच, पण त्यासोबतच त्याचे आई-वडील आणि कुटुंबीयांनी घेतलेले परिश्रमही थक्क करणारे आहेत. डॉ. कदम सर यांचे मार्गदर्शन त्याच्यासाठी ‘सोने पे सुहागा’ ठरले. तसेच, श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर यांची संपूर्ण टीम आणि विशेषतः सेक्रेटरी सौ. शुभांगी गावडे मॅडम यांचे प्रोत्साहनही मोलाचे ठरले.

*श्रावणी सोमवारचा योग आणि शिवतांडवाचं वादन*

हा विक्रम श्रावणी सोमवारी शिक्षण महर्षी डॉ. साळुंखे सांस्कृतिक भवन, कोल्हापूर येथे करण्यात आला. गोविंदने सकाळी ठीक आठ वाजता तबला वादनाला सुरुवात केली. सलग आठ तास पंचवीस मिनिटे वादन केल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही ताण नव्हता. तो अगदी हसमुख चेहऱ्याने वादन करत होता, जणू तो आणखी काही तास सहज वादन करू शकला असता. परंतु, आशिया पॅसिफिक ग्लोबल रेकॉर्डच्या नियमांनुसार पूर्व परवानगी घेऊन वेळेची मर्यादा निश्चित केली असल्याने निर्धारित वेळेतच त्याला थांबवावे लागले.

या ऐतिहासिक क्षणाचा खरा साक्षीदार शिक्षण महर्षी डॉ. साळुंखे सांस्कृतिक भवन ठरले. या कार्यक्रमासाठी आदल्या दिवशीपासूनच तयारी सुरू करण्यात आली होती. बॅनर लावण्यापासून ते कॅमेरा सेटिंग आणि आशिया पॅसिफिक ग्लोबल रेकॉर्डशी संपर्क साधण्यापर्यंतची सर्व व्यवस्था चोखपणे करण्यात आली होती.

 

*सिंधुदुर्ग ते कोल्हापूर, कौतुकाचा वर्षाव*

गोविंदच्या या कामगिरीमुळे भारतीय संगीत क्षेत्राला एक नवी उंची मिळाली आहे. सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. ‘कोकणच्या लाल मातीला कोल्हापूरच्या काळ्या मातीने निर्माण करून दिलेली एक ओळख’ अशा शब्दात त्याच्या कामगिरीचे वर्णन केले जात आहे. कोल्हापूरवासीयांनीही त्याला भरभरून कौतुक आणि शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी बाबुराव गावडे यांचे कुटुंबीय, गेळे गावचे माजी सरपंच श्री. प्रकाश गवस, श्री. प्रकाश गावडे, श्री. चंद्रकांत गावडे, मेनेन अँड मेनेनचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंबोलीवासीय त्याच्या या कामगिरीबद्दल त्यांचे कायम ऋणी राहतील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.