कबूलातदार गावकर जमिनीवरील वनखात्याची नोंद कमी करण्यासंदर्भात लवकरच बैठक

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आमदार दीपक केसरकर यांना आश्वासन 

सावंतवाडी: सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आणि माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आंबोली, चौकुळ आणि गेळे येथील कबुलातदार गावकर जमिनींवरील समस्यांबाबत निवेदन दिले. यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन महसूल मंत्र्यांनी दिले.

कबुलातदार गावकर जमिनीवरील वनखात्याची नोंद कमी करण्यासंदर्भात नुकताच शासन निर्णय झाला आहे. या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी, यासाठी महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वनमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची मागणी केसरकर यांनी केली. या मागणीला बावनकुळे यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत पुढील आठवड्यात बैठक घेऊन याबाबत निर्णय घेण्याचे मान्य केले.

याव्यतिरिक्त, केसरकर यांनी चौकुळ, आंबोली आणि गेळे येथील कबूलातदार गावकर जमिनींच्या वाटपाचा मुद्दाही मांडला. ही गावे क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठी असल्याने पारंपारिक पद्धतीने मोजणी करणे अवघड आहे. त्यामुळे या गावांची मोजणी आधुनिक तंत्रज्ञान वापरून प्रशिक्षित पथकामार्फत करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यासाठी आवश्यक अत्याधुनिक साहित्य प्रशासनाला उपलब्ध करून देण्याबद्दलही त्यांनी निवेदन दिले. महसूल मंत्र्यांनी याबाबतही सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच आधुनिक मोजणी साहित्य आणि विशेष प्रशिक्षित पथक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

या भेटीमुळे कबुलातदार गावकर जमीनधारकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. केसरकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यांच्या समस्या लवकरच मार्गी लागतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.