दोडामार्ग -सुहास देसाई
दोडामार्ग पोलिसांनी साटेली बाजारपेठेत सुरू असलेल्या अवैध जुगारावर छापा टाकून एका व्यक्तीला अटक केली आहे. आरोपी हा सार्वजनिक ठिकाणी ‘कल्याण मटका’ नावाचा जुगार चालवत असताना रंगेहाथ पकडला गेला.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार विजय सुरेश जाधव यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात यासंबंधी फिर्याद दाखल केली आहे. दिनांक ११/०९/२०२५ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास साटेली बाजारपेठेजवळ अजय अनंत शिरोडकर (वय ३९, रा. साटेली भेटशी) हा व्यक्ती स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे जुगार चालवत होता.
या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून रोख १,३२० रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. आरोपीवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ च्या कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नाईक करत आहेत.













