सावंतवाडीतील कबुलातदार गावकर जमिनीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार

रानटी हत्तींच्या उपद्रवावरही कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे मंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन

आ. दीपक केसरकर यांनी भेट घेत केली चर्चा 

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार आणि माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुंबईतील मंत्रालयात वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली. यात प्रामुख्याने सावंतवाडी तालुक्यातील कबुलातदार गावकर जमिनींचा आणि दोडामार्ग तालुक्यातील रानटी हत्तींच्या उपद्रवाचा समावेश होता.

कबुलातदार गावकर जमिनीचा प्रश्न मार्गी लागणार

सावंतवाडी तालुक्यातील आंबोली, चौकुळ, गेळे या गावांमध्ये असलेल्या कबुलातदार गावकर जमिनीवर ‘खाजगी वन’ असा शेरा आहे. हा शेरा काढून ही जमीन लाभधारक शेतकऱ्यांना देण्याबाबत महसूल विभागाने वन विभागाकडे प्रस्ताव सादर केला आहे. आमदार केसरकर यांनी या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याची विनंती वनमंत्री नाईक यांना केली. वनमंत्री गणेश नाईक यांनी हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे.

दोडामार्ग तालुक्यातील हत्तींच्या उपद्रवावर कायमस्वरूपी तोडगा

दोडामार्ग तालुक्यात वाढलेल्या रानटी हत्तींच्या उपद्रवामुळे शेतीचे आणि घरांचे मोठे नुकसान होत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी यापूर्वी झालेल्या बैठकीत हत्ती पकड मोहीम राबवण्याबाबत अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश वनमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार, प्रशासनाने हा प्रस्ताव वनमंत्र्यांकडे सादर केला आहे.

आमदार दीपक केसरकर यांनी या प्रस्तावावर लवकर निर्णय घेण्यासाठी बैठक आयोजित करण्याची मागणी केली. यावर वनमंत्री गणेश नाईक यांनी पुढील आठवड्यात बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आणि या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. यामुळे दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.