जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीचे वर्चस्व

सावंतवाडी । प्रतिनिधी : श्री देव ब्राह्मण सेवा समिती, सुकळवाड, मालवण यांच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सावंतवाडीच्या मुक्ताई ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले. स्पर्धेत एकूण ९४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, त्यापैकी मुक्ताई ॲकेडमीच्या ११ विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत १५ पैकी तब्बल ७ पारितोषिके पटकावली. या नेत्रदीपक यशाबद्दल सर्व स्तरांतून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

ही स्पर्धा पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा तीन गटांत घेण्यात आली. प्रत्येक गटात पहिल्या पाच विजेत्यांना रोख रक्कम, चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. मुक्ताई ॲकेडमीच्या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये, पहिली ते चौथी या गटात विघ्नेश अंबापूरकर याने द्वितीय क्रमांक पटकावला.

पाचवी ते सातवी या गटात यश सावंत याने प्रथम क्रमांक, गार्गी सावंत हिने द्वितीय क्रमांक, तर अथर्व वेंगुर्लेकर याने चौथा क्रमांक मिळवून ॲकेडमीचे नाव उंचावले. आठवी ते दहावी या गटातही ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांनी आपली छाप पाडली. हर्ष राऊळ याने द्वितीय, पार्थ गावकर याने चौथा, आणि साक्षी रामदुरकर हिने पाचवा क्रमांक पटकावत यश संपादन केले.

याव्यतिरिक्त, ॲकेडमीचे इतर विद्यार्थी चिदानंद रेडकर, भुमी कामत, विराज दळवी, आणि वेदांत डांगी यांनीही पाचपैकी चार सामने जिंकून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामागे प्रशिक्षक बाळकृष्ण पेडणेकर आणि मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल ॲकेडमी आणि विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.