सावंतवाडीत जिल्हास्तरीय ज्युदो-कराटे स्पर्धेचा शुभारंभ
सावंतवाडी । प्रतिनिधी : ज्युदो-कराटे सिंधुदुर्गात जिवंत ठेवण्यासाठी वसंत जाधव यांचे फार मोठे योगदान आहे. हे व्यक्तिमत्व सावंतवाडीत जन्माला आले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे गौरव उद्गार काढतानाच खेळात जिंकण्यासाठी मनात जिद्द बाळगली जाते तीच जिद्द आयुष्याच्या प्रवासात ठेवल्यास नक्कीच ध्येय गाठता येईल, असा विश्वास माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे व्यक्त केला.
संजू परब मित्र मंडळ आणि सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो-कराटे असोसिएशन, सावंतवाडी यांच्या वतीने ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय भव्य ज्युदो स्पर्धेचा शुभारंभ श्री. परब यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष वसंत जाधव, भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, परीट समाज जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर, बंटी राजपूरोहित, सत्यवान बांदेकर, दिनेश जाधव, सनी जाधव, अंजली पवार, लता जाधव आदींसह जिल्ह्यातील ज्युदो-कराटे मोठ्या संख्येने असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य व खेळाडू उपस्थित होते.
परब पुढे म्हणाले, ज्यूदो-कराटे हा एक साहसी खेळ आहे. हा खेळ खेळताना प्रत्येकाच्या मनात जिंकण्याची जिद्द असते. ती जिद्द आजच्या स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकांमध्ये दिसत आहे. त्यामुळे अशीच जिद्द आयुष्याच्या प्रवासात बाळगल्यास आपले अपेक्षित ध्येय, नक्कीच गाठता येईल असा विश्वास त्यांनी उपस्थित विद्यार्थी स्पर्धकांना दिला.
Sindhudurg