आचरा गावाला तालुक्याचा दर्जा मिळावा!

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदारकर यांचे निवेदन

मालवण | प्रतिनिधी : आचरा गावाचे तालुक्यात रूपांतर करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना याबाबत निवेदन सादर केले आहे. सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना हे निवेदन देण्यात आले.

आचरा गाव हे परिसरातील अनेक गावांचे मध्यवर्ती ठिकाण असून येथे सर्व शासकीय आणि आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. सन २०११ च्या जनगणनेनुसार आचरा गावाची लोकसंख्या ५,९०९ एवढी आहे. गावाच्या दैनंदिन व्यवहारासाठी दशक्रोशीतील रामगड, श्रावण, आडवली, पळसंब, त्रिंबक, चिंदर, हडी, वायंगणी, तोंडवळी, पोयरे, मुणगे, हिंदळे, मिठबाव, नारिंग्रे या गावातील लोकांची सतत ये-जा असते. या लोकांना सरकारी कामासाठी मालवण-देवगड येथे जावे लागते. यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाया जातो. आचरा गावाला तालुक्याचा दर्जा मिळाल्यास या समस्या दूर होतील.

आचरा गावात पोलीस स्टेशन, विद्युत सबस्टेशन, पोस्ट ऑफिस, मोठी बाजारपेठ, बँका, महसूल मंडळ अधिकारी कार्यालय, शासकीय धान्य गोडाऊन, शासकीय विश्रामगृह, प्राथमिक आरोग्य केंद्र या सुविधा उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त, आचरा गावाला पर्यटनासाठी भव्य असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. आचरा हे दशक्रोशीतील लोकांवर अवलंबून असलेले आणि विकसित गाव आहे. आचरा गावाला तालुक्याचा दर्जा देऊन त्याचे तालुक्यात रूपांतर करावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

मागणी पूर्ण झाल्यास, दशक्रोशीतील लोकांची मोठी सोय होईल, असे श्री. चिंदरकर यांनी नमूद केले आहे. श्री. चिंदरकर यांनी या मागणीच्या संदर्भात शासनाला आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे.

आचरा दशक्रोशीतील सरपंचांचे पत्र यासोबत देण्यात आले आहे. या यासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे असे चिंदरकर यांनी सांगितले. यावेळी शहर मंडल अध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगरसेवक पंकज सादये यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.