अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जागरूकता : टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी साकारली मानवी सकाळी : पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांची प्रमुख उपस्थिती
मालवण | प्रतिनिधी : युवा पिढी आणि नागरिकांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिस प्रशासनाच्या वतीने ड्रग्समुक्त सिंधुदुर्ग अभियान राबवले जात आहे. या अभियान अंतर्गत मालवण पोलिसांनी ‘नो ड्रग्स डे’ मोहिम अंतर्गत १३ ते १७ ऑगस्ट या कालावधीत विशेष मोहीम राबवली. या मानवी साखळी मोहिममध्ये टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या मानवी साखळीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी ‘अंमली पदार्थांना नाही म्हणा’ आणि ‘निरोगी जीवन जगा’ अशा घोषणा दिल्या. या उपक्रमाचा मुख्य उद्देश समाजामध्ये अंमली पदार्थांच्या व्यसनाचे दुष्परिणाम आणि त्यामुळे होणारी हानी याविषयी जनजागृती करणे हा होता.
यावेळी मालवण पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक मारुती जगताप, पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत यांसह पोलीस कर्मचारी, शिक्षक सहभागी होते. उपस्थित विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. पोलिसांनी अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी असलेल्या कठोर कायद्यांची माहिती दिली आणि समाजाला या गंभीर समस्येविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन केले. या मानवी साखळीमुळे मालवण शहरात अंमली पदार्थाच्या विरोधात एक सकारात्मक संदेश पोहोचला आहे. या मोहिमेमुळे अंमली पदार्थाच्या विळख्यातून समाजाला वाचवण्यासाठी पोलिसांचा सक्रिय सहभाग आणि नागरिकांचा प्रतिसाद दिसून आला आसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.












