मंडणगड कृष्णाजन्माष्टमी गोपाळकाला दहीहंडीचा उत्सव उत्साहात ; सहा थरांचा थरार

शहरातील शिवसेनेच्या दहीहंडीला पाच थरांची सलामी देताना भैरवनाथ गोविंदा पथक दुर्गवाडी, मंडणगड.
नगरपंचायत संकुलाच्या समोर शिवसेना तर दापोली फाटा येथे युवासेनच्या माध्यमातून दहीहंडी
गोविंदांचे उंच उंच मनोरे याच बरोबर करमणुकीचे कार्यक्रम ठरले आकर्षण

मंडणगड : प्रतिनिधी -कृष्णाजन्माष्टमी गोपाळकाला दहीहंडीचा उत्सव 16 ऑगस्ट 2025 रोजी तालुक्यात मोठ्या उत्सवात पार पडला. पारंपारीक गोविंदावर भर असलेल्या मंडणगड तालुक्यात गावागावातील गोविंदानी वाडीकोंडावर तीन ते पाच लहान लहान दहीहंड्या फोडण्यावर भर दिला तर शहरात सहा ते सात थरांचा थरार पाहायला मिळाला.

शहरातील बाजारपेठ नगरपंचायत संकुलाच्या समोर शिवसेनेच्या माध्यमातून दहीहंडीचे नियोजन करण्यात आले होते. मंडणगड तालुक्यासह नजीकच्या तालुक्यातील गोविंदा पथके या कार्यक्रमास उपस्थित होते. येथे गोविंदांच्या उंच उंच मनोरयांबरोबर विविध करमणुकीचे कार्यक्रम शहरवासियांना पाहायला मिळाले. दापोली फाटा समर्थ नगर येथे युवा सेनेच्या माध्यमातून दहीहंडीचे नियोजन करण्यात आले होते. यांच्यावतीने वतीने उंच थरांची दहीहंडी बांधण्यात आली होती. गोविंदा आला रे आला व तुझ्या घरात नाही पाणी घागर या गाण्यांच्या घोषात पारंपारिक ढोल ताश्या तालावर याठिकाणी गोविंदांनी फेर धरला.

तालुक्यात एकूण 4 सार्वजनीक व 853 खाजगी दहीहांड्या बांधण्यात आल्या होत्या. मंडणगड शहरात शिवसेना, ओमसाई गोविंदा पथक तर भिंगळोली समर्थ नगर येथे युवा सेना, दुर्गवाडी गोविंदा पथक, भिंगळोली गोविंदा पथक यांनी यांनी आपली गोविंदाची कला सादर करत सायंकाळी चार नंतर मंडणगड शहरातील गोविंदानी हंड्या फोडण्यास गर्दी केली. गोविंदांना प्रोस्ताहन देण्यासाठी तालुक्यातील दहीहंडीप्रेमींनी शहरात गर्दी केली होती. उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी मंडणगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.