जिल्हा पोलीस अधीक्षकांसह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडीतील काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थविरोधी कार्यशाळा आणि चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असे एकूण ५० ते ६० जण या चर्चासत्रात सहभागी झाले होते.
या कार्यशाळेत सिंधुदुर्ग जिल्हा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजेश नवांगुळ, सिंधुदुर्ग जिल्हा इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. केसरे, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीचे डॉ. निखिल अवधूत, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय दळवी, बालरोगतज्ञ डॉ. दत्तात्रेय सावंत आणि केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. आनंद रासम यांसारखे १५ ते २० पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी उपस्थितांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांची जाणीव करून दिली आणि या गंभीर समस्येचे उच्चाटन करण्यासाठी प्रत्येकाने कसे योगदान द्यावे, याबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिनिधींसोबत या विषयावर चर्चाही केली.
ही कार्यशाळा अंमली पदार्थांविरुद्धच्या लढाईत समाजातील विविध घटकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वाचे पाऊल ठरली. वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनीही या पुढाकाराला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, यापुढेही अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आश्वासन दिले.












