ओरोस महामार्गावर स्विफ्ट कारचा ताबा सुटून सर्विस रोडवर पलटी होत मोटर सायकल स्वराला धडक
अभिजीत बोडेकर हा युवक व त्याची काकी गंभीर जखमी
सिंधुदुर्गनगरी, प्रतिनिधी :
मुंबई-गोवा महामार्गावरील ओरोस येथील भवानी मंदिरासमोरील धोकादायक वळणावर मंगळवारी सायंकाळी पुन्हा एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने धावणाऱ्या स्विफ्ट कार च्या चालकाचा ताबा सुटल्याने कारने महामार्गाच्या बाजूचे लोखंडी रेलिंग तोडत थेट सर्व्हिस रोडवर पलटी घेतली. दुर्दैवाने त्याचवेळी सर्व्हिस रोडवरून दुचाकीने प्रवास करणारे इंद्रजीत बोडेकर हा तेवीस वर्षीय युवक आणि त्यांच्या पाठीमागे बसलेली त्याची काकी पुष्पा बोडेकर वय ५० यांना या कारची जोरदार धडक बसून दोघेही गंभीर जखमी झाले आहेत, त्या दोघांना अधिक उपचारासाठी गोव्याला पाठविण्यात आले आहे.
हा अपघात सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास घडला. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, कारने रेलिंग उध्वस्त करत व मार्गावरील लाईटचा पोल वाकवून थेट सर्व्हिस रोडवर प्रवेश केला आणि दुचाकीस्वारांना चिरडले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी व पोलिसांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविले.
दरम्यान, भवानी मंदिरासमोरील हे वळण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहे. याच ठिकाणी यापूर्वीही अनेक गंभीर अपघात झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे महामार्गाच्या बांधकामातील तांत्रिक त्रुटी, वळणाची रचना आणि सुरक्षेच्या अपुऱ्या उपाययोजनांमुळेच हे ठिकाण ‘मृत्यूचा सापळा’ बनल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
“आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या धोकादायक वळणाचे तातडीने तांत्रिक परीक्षण करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
या अपघातात दुचाकीस्वार इंद्रजीत सखाराम बोडेकर (वय 23) व त्यांच्या पाठीमागे बसलेल्या पुष्पा तुकाराम बोडेकर (वय 50, दोघेही रा. ओरोस रवानाथनगर) हे गंभीर जखमी झाले. तसेच वाहनांचे आणि रस्त्यालगतच्या रेलिंग व लाईट पोलचे नुकसान झाले.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, परशुराम लालप्पा लमानी (वय 27, मूळ रा. बागलकोट, कर्नाटक, सध्या रा. तळेरे) याने मारुती सुझुकी स्विफ्ट (क्र. KA 22 P 7361) निष्काळजीपणे चालविताना महामार्गावरील लोखंडी रेलिंग व लाईटच्या पोलला धडक दिली. त्यानंतर कार महामार्गावरून सर्व्हिस रोडवर कोसळून ओरोस फाटा-नवनाथनगर मार्गावरील दुचाकी (क्र. MH 07 AP 5088) वर पडली.
याप्रकरणी राहुल गौतम कांबळे यांच्या फिर्यादीवरून सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल आखरे करीत आहेत.













