चिपळूण (वार्ताहर) : देशभक्तीची भावना, विद्यार्थ्यांचा उत्साह आणि गावाच्या एकतेचा सुंदर संगम अशा वातावरणात जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा कापरे देऊळवाडा येथे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमासाठी नवहिंद प्रतिष्ठान, मुंबई ,कापरे देऊळवाडी अध्यक्ष सुरेश मोरे आणि सदस्य यांच्या सौजन्याने तब्बल दहा हजार रुपयाचे उदार सहकार्य लाभले. त्यामुळे हा सोहळा अधिक भव्य आणि संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून उपसरपंच तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आशिष मोरे, नवहिंद प्रतिष्ठानचे सल्लागार विश्वनाथ सावंत, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन तथा निवृत्त केंद्रप्रमुख तुकाराम गुरव सर,प्रभारी केंद्रप्रमुख संतोष होमकर, मुख्याध्यापिका मानसी महाडीक, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा शमिका राऊत, सदस्य संदिप पवार आणि मोहन खेराडे, प्रतिष्ठीत नागरिक चंद्रकांत मोरे यांची उपस्थिती लाभली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये शाळेत घेतलेल्या वक्तृत्व, निबंध, हस्ताक्षर, प्रश्नमंजुषा, टाकाऊतून नवनिर्मिती, गीतगायन, रांगोळी, भोंडला तसेच क्रीडा स्पर्धा यामध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये “गुणवंत आदर्श विद्यार्थीनी” हा मानाचा किताब तनिष्का तुकाराम कदम हिने पटकावला. तिच्या यशाने संपूर्ण शाळा आणि गाव अभिमानाने भरून गेले. सोहळ्याचे सुत्रसंचालन पदवीधर शिक्षक संतोष तांबे आणि उपशिक्षक गणेश सुर्वे यांनी आपल्या प्रभावी व विनोदी शैलीत केले. संपूर्ण कार्यक्रमात देशभक्तीपर गीते, विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सादरीकरण आणि मान्यवरांच्या प्रेरणादायी भाषणांनी रंग भरले. या गुणगौरव सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, स्पर्धात्मक वृत्ती आणि समाजाभिमुखता वाढली. शाळा, पालक, मान्यवर आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमुळे हा दिवस गावाच्या स्मरणात कायम राहील. “विद्यार्थ्यांचे यश म्हणजे गावाचा अभिमान आणि शाळेचा सन्मान” या भावनेनेच हा सोहळा प्रेरणादायी ठरला.












