डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती मिरजोळीच्या प्रयत्नाला अखेर यश

उक्ताड व मिरजोळी साखरवाडी रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामाला सुरूवात
उपोषण तात्पुरते स्थगित

चिपळूण (वार्ताहर) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती मिरजोळी यांनी १५ ऑगस्ट पूर्वी उक्ताड व मिरजोळी साखरवाडी रस्त्यावर पडलेले खड्डे भरावेत अन्यथा उपोषणाला ठाम असल्याबाबतचे निवेदन दिले होते. याबाबत राष्ट्रीय महामार्गाने १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. खड्डे भरायला सुरुवात केली आहे. पाऊस कमी होताच दोन दिवसात पेव्हर ब्लॉक बसविण्यात येतील असे आश्वासन दिल्याने समितीने तात्पुरते उपोषण स्थगित केले आहे.
२९ जुलै रोजी मिरजोळी बौद्धवाडी येथील महिला तिच्या पतीसोबत दुचाकीवरून जात असताना खड्डे चुकवताना तोल जाऊन खड्ड्यात पडल्याने गंभीर दुखापत झाली. तसेच याठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढत आहेत. याबाबत समितीने राष्ट्रीय महामार्ग, प्रांत कार्यालय व तहसीलदार कार्यालय तथा चिपळूण पोलीस ठाणे यांना निवेदन दिले होते. यानंतर संबंधित विभागाने पेव्हर ब्लॉक बसवून खड्डे भरून देतो असे आश्वासन दिले. मात्र, आठ ते दहा दिवस उलटून गेले तरी खड्डे भरले गेले नाही. हे निदर्शनात आल्यानंतर समितीने पुन्हा निवेदन दिले व सातत्याने पाठपुरावा करत असल्याने संबंधित विभागाचे अधिकारी शाम खुणेकर यांनी तांत्रिक अडचणीमुळे काम सुरू करता येत नसल्याचे सांगितले. मात्र समिती उपोषणावर ठाम असल्याने १५ ऑगस्ट रोजी काम सुरू केल्याने समितीने उपोषण तात्पुरते स्थगिती केले आहे असे पत्रे दिले. खड्डे भरण्यास सुरुवात केल्याने वाहनचालक व ग्रामस्थ यांनी स्मारक समितीचे कौतुक करून आभार मानले. तसेच समितीने शाम खुणेकर यांनी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद मानले.