जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी भू मधील दोघांवर गुन्हा

ग्रामपंचायत लिपिकाची फिर्यादः ग्रा.पं. कार्यालयावर ग्रामस्थांची धडक

राजापूरः प्रतिनिधी :तालुक्यातील भू ग्रामपंचायतीमधील लिपिकाला अधिकाऱ्यांसमोरच काही ग्रामस्थांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी राजापूर पोलीसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तशी माहिती पोलीसांनी दिली आहे. १४ ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला आहे.

या प्रकरणानंतर काही ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर धडक देत आपला संताप व्यक्त केला. दरम्यान याप्रकरणी घटनेचे गांभीर्य ओळखून प्रशासकीय अधिकारी व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल शंकर सरफरे, अमित रमाकांत सरफरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

नरेंद्र कृष्णा जाधव (५५ रा, भू बौध्दवाडी राजापूर) हे भू ग्रामपंचायतीत लिपिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी याबाबतची तक्रार राजापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे १४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी चार वाजता सरफरेवाडीतील रस्त्यावरील वादाच्या पाहणीसाठी गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, प्रशासक पी.वाय. सावंत, ग्रामसेवक प्रशांत कांबळी व संबंधित अधिकारी भू ग्रामपंचायत कार्यालयात दाखल झाले होते. त्यानंतर सर्वजण रस्त्यावरील बांधाच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले असता तेथे उपस्थित असलेल्या अनिल शंकर सरफरे यांनी नरेंद्र जाधव यांच्यावर ‘रेकॉर्डची वाट लावली’ असा आरोप करत जातीवाचक शिवीगाळ केली.

नरेंद्र जाधव यांनी विरोध केल्यावर अमित रमाकांत सरफरे यांनीही जातीवाचक शब्दांचा वापर करत सार्वजनिक ठिकाणी अपमान केला. अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. अधिका-यांच्या उपस्थितीत घडलेल्या या प्रकारामुळे नरेंद्र जाधव घाबरून गेले. त्यांनी राजापूर पोलीसात तक्रार दाखल केली. त्यानंतर ही घटना भू परिसरात पसरल्यानंतर शुक्रवारी सकाळी दहा वाजता राजापूर तालुका बौध्दजन संघ ग्रामीणचे अध्यक्ष महादेव गोठणकर आणि संघाचे सचिव उमाकांत जाधव यांच्यासमवेत ग्रामस्थांनी आक्रमक होत ग्रामपंचायतीवर धडक दिली. आक्रमक ग्रामस्थांनी प्रशासक सावंत यांना धारेवर धरत जाब विचारला. लोकांची वाढती गर्दी लक्षात घेता पोलीसांना पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती कळताच रत्नागिरी मानवाधिकारी संघटनेचे गाडे, डीवायएसपी माईनकर, पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांची समजूत काढली.

दरम्यान याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३चे कलम ३५२, ३५१ (२) तसेच अनुसूचित जाती व जमात अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कलम ३ (१) (आर), ३ (१) (एस) प्रमाणे अमित सरफरे व अनिल सरफरे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीसांनी तपास सुरू केला आहे.