महाविद्यालयाच्या विकासासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक – श्री. दिलीप सावंत

विद्यार्थी महाविद्यालयीन उपक्रमामध्ये व्यस्त राहिल्यास त्यांची उदासीनता नक्कीच कमी होईल.– रंजन चिके.

फोंडाघाट : कुमार नाडकर्णी —
कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथे अंतर्गत गुणवत्ता हमी समिती (IQAC) च्या वतीने “महाविद्यालयाच्या विकासाबाबत पुढील रूपरेषा” या विषयावर संवादात्मक सभेचे आयोजन करण्यात आले. या वेळी शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवर मार्गदर्शनासाठी उपस्थित होते.या सभेचे मार्गदर्शक नीव फाऊंडेशन, मुंबईचे अध्यक्ष श्री. दिलीप सावंत यांनी विचार मांडले. ते म्हणाले, “निसर्गाच्या बदलाप्रमाणे मानवालाही वाटचाल करावी लागते. आहे त्या परिस्थितीला सामोरे जाऊन सकारात्मक विचारांचा अवलंब केला, तर प्रत्येक संधीचे सोने करता येईल. शैक्षणिक संस्थांनी, ग्रामपंचायत व विविध सामाजिक संघटनांनी एकत्रितपणे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत. त्यामुळे समाजामध्ये शैक्षणिक वातावरणाची सकारात्मक जाणीव निर्माण होईल.

यानंतर मार्गदर्शन करताना महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री. रंजन चिके म्हणाले, “विद्यार्थ्यांची उदासीनता आणि मानसिकता लक्षात घेऊन त्यांना प्रेरित करणे ही काळाची गरज आहे. शिक्षकांनी घेतलेल्या उपक्रमांची व विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाची माहिती पालकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. दरवर्षी स्वच्छता मोहिमा, विविध कला व क्रीडा तसेच सांस्कृतिक उपक्रमांचे सातत्य राखणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे महत्त्व पटवून देऊन व्याख्याने, मार्गदर्शन वर्ग व परीक्षा आयोजित करणे गरजेचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांची उदासीनता नक्कीच कमी होईल.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी सद्यस्थितीवर भाष्य करताना सांगितले की, “आज विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती चिंताजनक प्रमाणात घटत आहे. त्यावर उपाय शोधण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. महाविद्यालयाचे नाते हे विद्यार्थ्यांशी अतूट असले पाहिजे. आपल्या माजी विद्यार्थ्यांचे ज्ञान व कौशल्य याचा सदुपयोग होण्यासाठी स्नेहमेळावे महत्त्वाचे आहेत.अध्यक्षीय भाषणात संस्थेचे चेअरमन मा. श्री. महेश सावंत यांनी विद्यार्थ्यांसाठी संस्थेची बांधिलकी व्यक्त करताना सांगितले की, “पंचक्रोशीतील एकाही विद्यार्थ्याला उच्च शिक्षणापासून वंचित राहू दिले जाणार नाही. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी संस्थेच्या वतीने सर्वतोपरी मदत केली जाईल. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींमार्फत मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येईल.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख आयक्यूएसी प्रमुख प्रा. डॉ. राजाराम पाटील यांनी करून दिली. तर आभार प्रदर्शन प्रा. विनोदसिंह पाटील यांनी केले.