सर्वसामान्यांचे डॉक्टर ..!

संतोष वायंगणकर
समाज कितीही काळानुरूप बदलत गेला तरीही काही व्यक्ती या आपल्यातील असलेल्या सद्गुणांची अगदी शेवटच्या श्वासापर्यंत जपणुक करत असतात. आजच्या झगमगत्या जगात माणसातील चांगुलपणाची किती आणि कशी मोजमाप होते हे सांगता येत नाही. मात्र, अशातच बदलत्या समाजव्यवस्थेतही कशाची आणि कुणाचीही पर्वा न करता नितीमुल्यांचा आयुष्यभर ज्यांनी पुरस्कार केला त्या कळसुली गावचे सुपूत्र कणकवली, मालवण चे दोनवेळा आमदार राहिलेल्या डॉ. य.बा.दळवी यांचे निधन झाले. डॉ.य.बा.दळवी यांच्या निधनाची माहिती मिळाली आणि खादीधारी पेहरावातील एक साधा सरळ माणूस नजरेसमोर उभा राहिला.
डॉ.य.बा.दळवी १९५३ साली वैद्यकिय परीक्षा उत्तीर्ण झाले. डॉक्टरकीची पदवी घेतल्यानंतर डॉक्टर य.बा.दळवी मुंबईत न थांबता आपल्या कोकणातील गावाकडे आले आणि गावातच त्यांनी रूग्णसेवा सुरू केली. खरंतर त्याकाळात डॉ.य.बा.दळवी पुणे, मुंबईसारख्या शहरातही मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल होऊ शकले असते. परंतु डॉक्टर दळवी यांनी पैशांपेक्षा गावातील रूग्णसेवेला महत्व दिले. गाव परिसरातील अनेक गावात ५.५ कि.मी. पायी चालत जात लोकांना सेवा दिली. आणि कोकणातील गाववाल्यांनाही आपला हक्काचा डॉक्टर मिळाला. डॉक्टर दळवी यांनी कोरोनाकाळापर्यंत रूग्णांची अविरत सेवा केली. परंतु त्यानंतर प्रकृती ठिक नसल्याने त्यांनी रूग्णसेवा थांबवली. त्याकाळात कोकणातील ग्रामीण भागात फारशा वैद्यकिय सुविधा नव्हत्या. त्यामुळे कोकणातील ग्रामीण भागात रहाणाऱ्या ग्रामस्थांना आरोग्य सुविधा मिळत नाहीत यामुळेच डॉ. दळवी यांनी मुंबई सोडून गाव गाठले. गावपरिसरात त्याकाळी दळणवळणाच्या कोणत्याही सुविधा नव्हत्या. मग डॉक्टर रात्री-अपरात्री कितीही वाजता आलेल्या गावकऱ्यांसोबत हातात बॅग घेऊन निघायचे. जेवणाचा, झोपेचा कोणताही विचार त्यांच्या मनात कधी येत नव्हता. केवळ गरीब रूग्णांची सेवा करणे या एवढ्या विचाराने ते सतत काम करत राहिले. डॉक्टर य.बा.दळवी एकिकडे रूग्णसेवा करत असतानाच त्यांचा जनतेशी असलेला दांडगा संपर्क आणि समाजवादी विचारांचा त्यांच्यावर असलेला पगडा, समाजवादी विचारवंत नेते बॅ.नाथ पै, प्रा.मधु दंडवते यांचा फार निकटचा संबंध आला. त्यामुळेच १९६२ साली य.बा.दळवी यांनी प्रजासमाजवादी पक्षातर्फे त्यावेळच्या कणकवली विधानसभा मतदार संघातून निवडणुक लढविली आणि ते विजयी झाले. तर १९७८ मध्ये मालवण मतदार संघातून जनता दलतर्फे निवडून आले होते. डॉ.दळवी यांनी नेहमी सामाजिक कामांना महत्व दिले. गावातील शिक्षणाची सुविधा होण्यासाठी हायस्कूलची स्थापना केली. रस्ते तयार करण्यासाठी गावकऱ्यांसोबत श्रमदानाने रस्ते तयार केले. अशा सामाजिक कामांना डॉ.य.बा.दळवी यांनी महत्व दिलं. राजकारण हे समाजाच्या विकासासाठी केलं पाहिजे हाच त्यांचा शेवटपर्यंत दृष्टीकोन राहिला. समाजवादी विचारांच्या विचारधारेत कार्यरत असणाऱ्या डॉ. दळवी यांनी नेहमीच समाजहित आणि सामाजिक विकासाला भर दिला. दोनवेळा आमदार म्हणून राहिलेल्या डॉ.य.बा.दळवी यांनी त्यांच्यातला साधेपणा त्यांनी शेवटपर्यंत जपला. रहाणीमानही नेहमी साध राहिलं. त्यांचा मालवणीतून होणारा संवाद नेहमीच आपलेपणाचा वाटत राहिला. जीवनातील त्यांच्या शिस्तबद्धतेमुळेच ते १०० वर्षे आयुष्यापर्यंत जगू शकले. एक स्वच्छ चारित्र्यवान, निर्मळ मनाचा समाजवादी साथीना आपण मार्गदर्शक म्हणून यापुढच्या काळात अनुभवू शकणार नाही. परंतु आजच्या बदलत्या समाज व्यवस्थेतही डॉ. य.बा.दळवी यांच आयुष्य हा एक आदर्शाचा वास्तूपाठ होता. डॉ.य.बा.दळवी यांच्या जाण्याने आपल्या समाजाचे फार मोठे नुकसान झाले आहे. डॉ. य.बा.दळवी यांना विनम्र अभिवादन !