दापोली| राकेश कोळी
दापोली तालुक्यातील फणसू–भडवले मार्गावर मुसळधार पावसामुळे आलेल्या पाण्याने रस्ता पूर्णपणे जलमय झाला असून या मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. नद्या–नाले तुडुंब भरून वाहत असल्याने सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी रस्त्यांवर पुराचे पाणी साचले असून वाहतूक विस्कळीत झाली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. पूरस्थितीचा धोका लक्षात घेता स्थानिक प्रशासन सतर्क असून मदत व बचाव यंत्रणा देखील सज्ज ठेवण्यात आली आहे.












