चिपळूण (प्रतिनिधी) : श्री लक्ष्मी केशव देवस्थान शिरळ मालघर तालुका चिपळूण तर्फे मालघर येथील श्रीराम मंदिरामध्ये श्रावण मासानिमित्त अखंड श्री राम नाम जप यज्ञ संपन्न झाला. हा कार्यक्रम शनिवार दि. ९ऑगस्ट रोजी पहाटे तीन ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवार दि. १० रोजी पहाटे ३ पर्यंत करण्यात आला.
दि. ९ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजता सुरू झालेला,”श्रीराम जय राम जय जय राम” या मंत्राचा अखंड २४ तास जप करून १० ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजता सांगता करण्यात आली. कार्यक्रमानिमित्ताने राम मंदिर मालघर येथे पहाटे श्रींची षोडशोपचारी पूजा करणेत आली. सकाळी दहा ते एक पर्यंत रामभक्तांची बैठक घेण्यात आली. यानंतर श्रींचा प्रसाद झाला .विष्णुसहस्रनाम आवर्तने आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर सर्व राम भक्त मंदिरामध्ये एकत्र येऊन राम नामाचा जप करीत होते. सायंकाळी आरती, छबिना मग रात्रीचा प्रसाद, उत्तर रात्री मंदिरामध्ये भजन करून शेवटी सामुहिक जप करून पहाटे मंत्रपुष्प करून या दिवसभराच्या कार्यक्रमाची पहाटे तीन वाजता सांगता करण्यात आली. हा रामनाम जप यज्ञ यशस्वी करण्यासाठी श्री लक्ष्मी केशव देवस्थानचे सर्व विश्वस्त आणि रामभक्त यांनी खूप मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.













