कोळकेवाडी येथे मोफत आयुर्वेदिक आरोग्य शिबिर उत्साहात

चिपळूण (वार्ताहर) : ग्रामीण भागातील लोकांच्या सेवा करण्यामध्ये खूपच धन्यता वाटते. त्यांच्या सेवेतच खरा आनंद व परमार्थ मिळतो, असे प्रतिपादन आयुर्वेदिक आधार चॅरिटेबल ट्रस्ट चिपळूण अध्यक्षा डॉ.वर्षा कुडचडकर यांनी सांगितले. जांभराई चौथा टप्पा परिसर गाव कोळकेवाडी येथे प्रयोग भूमी शिक्षण केंद्र व आयुर्वेदिक आधार चॅरिटेबल ट्रस्ट चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि.११ऑगस्ट रोजी मोफत आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.
यावेळी चंद्रशेखर कुडचडकर, संचित कुडचडकर, श्रुती हळदणकर, सागर खोडदे, आकांक्षा खोडदे, सचिन वाशीवावे, प्रियंका वाशीवावे, संदीप शिवगण आदी उपस्थित होते. या शिबिरात पुढे बोलताना डॉ.वर्षा कुडचडकर म्हणाल्या की, आयुर्वेदाला सुमारे ३ हजार वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उतुंग परंपरा आहे. हरबल कायरोप्रॅक्टिक उपचाराबाबत उद्योधन झाले. या शिबिरात रक्तगट तपासणी, टी.टी इंजेक्शन आदि तपासण्या मोफत केल्या. विविध रोगांवर उपचार आणि मार्गदर्शन करून मोफत औषधे वाटप केले. त्यानंतर वृक्षारोपण करण्यात आले. या शिबिरामध्ये परिसरातील ५० ते ५५ रुग्णाने लाभ घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी चिपळूण येथील मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह संदीप शिवगण यांनी आभार मानले.