मळगाव येथील वृक्षवल्ली सोसायटीत युवकाची गळफास घेत आत्महत्या

​सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील वृक्षवल्ली सोसायटीमध्ये राहणाऱ्या श्रीकांत अशोकराव गायकवाड (वय ४१) या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची नोंद सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, मूळचे चिकुंद्रा, तुळजापूर येथील असलेले श्रीकांत गायकवाड हे काही कामानिमित्त मळगाव येथील वृक्षवल्ली सोसायटीमधील रूम नंबर ४ मध्ये राहत होते. गुरुवारी दुपारच्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या खोलीमध्ये साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
​या घटनेची माहिती त्यांची पत्नी अलका कांबळे यांनी पोलिसांना दिली. सतत फोन करूनही श्रीकांत प्रतिसाद देत नसल्याने त्यांना संशय आला. त्यांनी घरी जाऊन पाहिले असता, श्रीकांत हे हॉलमधील पंख्याला साडीच्या साहाय्याने लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.

​घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनेची नोंद सावंतवाडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. मात्र, आत्महत्याचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.