रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चरवेली ते कापडगावदरम्यान आज दुपारी सुमारास मोठी दुर्घटना टळली. जयगडहून कर्नाटकला निघालेल्या एलपीजी गॅस टँकरमधून अचानक गळती सुरू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मागून येणाऱ्या वाहनचालकांच्या प्रसंगावधानामुळे चालकाने टँकर वेळीच थांबवला आणि संभाव्य अनर्थ टळला.
टाकीतील गॅसचे तापमान वाढल्याने दाब प्रचंड वाढला व वरच्या पाईपमधून गॅस ओव्हरफ्लो होऊ लागला. जवळपास अर्धा तास हा प्रसंग सुरू राहिला. गॅसचा तीव्र वास पसरला होता, मात्र परिसरात मानवी वस्ती नसल्याने जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव आणि पाली पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत ठेवली.
वाहतूक कंपनीच्या प्रतिनिधींनी टँकर तपासून उष्णतेमुळे गॅस बाहेर आला असल्याचे सांगितले. त्यांनी टाकीवर थंड पाणी मारून दाब कमी करण्याची उपाययोजना केली आणि टँकर पुढे मार्गस्थ झाला. सदर टँकरमध्ये १२ टन क्षमतेपैकी ११.७६० टन गॅस भरलेला होता. पूर्ण क्षमतेजवळ भरल्याने उष्णतेमुळे धोका वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर महामार्गावरील धोकादायक वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून गॅस वाहतूक कंपन्यांच्या निष्काळजीपणावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.













