गणेशोत्सवासाठी रत्नागिरीत येणाऱ्या चाकरमान्यांची होणार आरोग्य तपासणी

जिल्हा प्रशासन सज्ज; महामार्ग आणि रेल्वे स्थानकांवर २० आरोग्य केंद्रे

रत्नागिरी: गणेशोत्सव २०२५ च्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या लाखो चाकरमान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग आणि रेल्वे स्थानकांवर आरोग्य तपासणी पथके तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही पथके २२ ऑगस्टपासून ७ सप्टेंबरपर्यंत कार्यरत राहणार आहेत.
२० केंद्रांवर आरोग्य सुविधा
१९ ऑगस्ट रोजी झालेल्या नियोजन बैठकीत यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यानुसार, जिल्ह्यात एकूण २० आरोग्य तपासणी केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या केंद्रांवर प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी, आवश्यक औषधे आणि प्रथमोपचाराची सोय उपलब्ध असेल. तसेच, तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी प्रत्येक केंद्रावर रुग्णवाहिकेची (अ‍ॅम्ब्युलन्स) व्यवस्थाही करण्यात आली आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने या ठिकाणी मंडप (पेंडॉल) उभारले जातील, जिथे आरोग्य विभागासह इतर संबंधित विभागांचे कर्मचारी उपस्थित राहतील.
तालुकानिहाय तपासणी केंद्रांची ठिकाणे
खेड (३ केंद्रे):
* गुणदे फाटा
* भरणेनाका
* खेड रेल्वे स्टेशन
चिपळूण (६ केंद्रे):
* पेढे सवतसडादर्शन
* कळंबस्ते तिठा
* बहादुरशेख नाका
* अलोरे घाटमाथा (चेकपोस्ट)
* दहिवली फाटा
* चिपळूण रेल्वे स्टेशन
संगमेश्वर (५ केंद्रे):
* तुरळ
* एसटी स्टँड जवळील ब्रिजचे वळण
* वांद्री
* देवरुख मुर्शी (चेकपोस्ट)
* संगमेश्वर रेल्वे स्टेशन
रत्नागिरी (३ केंद्रे):
* हातखंबा तिठा
* पाली
* रत्नागिरी रेल्वे स्टेशन
लांजा (२ केंद्रे):
* वेरळ
* कुवे गणपती मंदिर समोर
राजापूर (१ केंद्र):
* राजापूर एसटी स्टँड
चाकरमान्यांना सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे यांनी चाकरमान्यांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश गणेशोत्सवाच्या काळात चाकरमान्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हा असून, जिल्हा प्रशासन त्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.