परुळेबाजार गाव रक्तक्षय (अनिमीया) मुक्त गाव करण्यासाठी नियोजन

परुळे : प्रतिनिधी

गांव विकास आराखड्यातील महीला स्नेही गांव संकल्पने अंतर्गत रक्तक्षय (अनिमिया ) मुक्त गाव करणेसाठी नियोजन सभा परुळेबाजार ग्रामपंचायत येथे संपन्न झाली. यावेळी परुळेबाजार गाव रक्तक्षय (अनिमीया) मुक्त गाव करण्यासाठी नियोजन करण्यात आले.

स्त्रिया तसेच किशोरवयीन मुलींमध्ये वाढते अनिमीयाचे प्रमाण व त्यामुळे निर्माण होणा-या गंभीर स्वरूपाच्या समस्या यावर लक्ष केंद्रित करून त्यावर उपाय योजना करणेकरीता यशदा महाराष्ट्र, जिल्हा परिषद, पंचायत समिति तसेच सहायक ट्रस्ट च्या वतीने महिला स्नेही संकल्पने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील परुळेबाजार गावात अनिमीया मुक्त गाव हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी परुळेबाजार ग्रामपंचायत मध्ये नियोजन बैठक घेण्यात आली.

सदर नियोजन बैठकीस यशदा मार्फत सहायक ट्रस्टचे प्रशिक्षक तसेच कार्यक्रम समन्वयक प्रमोद शिंदे उपस्थित होते, उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रमोद शिंदे यांनी ऐनमीया हा आजार नसून शारीरिक स्थिति असल्याचे स्पष्ट केले. तसेच ऐनमीयावर मात करणेसाठी माहिती व उपाययोजना याविषयीची माहीती दिली. यावेळेस प्रमोद शिंदे यांनी ऐनमीया मुक्त गाव करताना यासाठी वार्षिक नियोजन, यात हिमोग्लोबिन तपासणी, आरोग्य, पोषण आणि सेंद्रिय पोषण परसबाग निर्मितीवर प्रशिक्षण, भिंती रंगविणे, गावात होणाऱ्या स्पर्धा, त्यासाठी येणाऱ्या खर्चाचा आराखडा, तसेच यात शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उमेद व मावीम ची भूमिका गावाचे नेतृत्व म्हणून सरपंच, व पंचायत सदस्य यांची भूमिका या शिवाय शासन स्तरावरून ग्राम विकास अधिकारी तसेच पंचायत समितीवरून विस्तार अधिकारी तसेच गट विकास अधिकारी यांचे सहकार्य यावर मांडणी केली. यावेळेस ऐनमीया फ्री इंडिया फोरम चे प्रशिक्षक स्थानिक संस्था गोपुरी आश्रम कणकवली संस्थेचे श्री. नेवगे यांनी वर्ष भरात त्यांचेकडून राबविण्यात येणारे नियोजन सांगितले. बैठकीच्या शेवटी गावाचे सरपंच यांनी जिल्ह्यातून फक्त आमचे एकच गाव या कार्यक्रमासाठी निवडले असल्याने अभिमान व्यक्त करत आता जबाबदारी वाढल्याचे नमूद केले तसेच वरील सर्व उपक्रम राबवून आमचे गांव नक्कीच ऐनमीया मुक्त करू असे जाहीर केले. संदर बैठकीचे नियोजन ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे यांनी केले होते, तसेच बैठकीस प्रविण प्रशिक्षक हर्षदा वाळके, उपसरपंच संजय दूधवडकर, सदस्य सुनाद राऊळ, सीमा सावंत, तन्वी दूधवडकर, नमिता परुळेकर, उपस्थित ग्राम संघाचे अध्यक्ष व सचिव, प्रभाग प्रमुख, आशा, अंगणवाडी कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रतिनिधी उमेद प्रभाग समन्वयक, उपस्थित होते.