संस्कार भारतीतर्फे ‘चला करूया गणपती’ कार्यशाळा संपन्न!

चिपळूण (प्रतिनिधी) : कलाक्षेत्रातील नामवंत संस्था संस्कार भारती उत्तर रत्नागिरी तर्फे प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही ” चला करूया गणपती” ही कार्यशाळा चिपळूणातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ रांगोळीकार आणि मूर्तिकार श्रीयुत संतोष केतकर यांचे मार्गदर्शनाखाली रविवार दि. २७ जुलै आणि रविवार दि. ३ ऑगस्ट या दोन दिवशी संपन्न झाली.

दि. २७ जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे बापू काणे, संस्कार भारती अध्यक्ष शरद तांबे, महामंत्री मंगेश बापट, संतोष केतकर, आनंद पाटणकर, सौ. सोनाली खर्चे, श्रीमती ॲड. विभावरी रजपूत यांचे हस्ते दीपप्रज्वलन आणि नटराज पूजन करून या कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर संतोष केतकर यांनी सर्व उपस्थितांचे शब्द सुमनाने स्वागत केले. डॉ. अमेय भावे आणि आनंद पाटणकर सौ. मेघना गोखले यांनी संस्कार भारतीचे ध्येय गीत सादर केले आणि या कार्यशाळेला सुरुवात झाली. सर्वप्रथम संतोष केतकर यांनी शाडूच्या मातीपासून मूर्ती कशी बनवावी याचे प्रात्यक्षिक टप्प्याटप्प्याने दाखवले आणि उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थींनी मूर्ती बनवण्यास सुरुवात केली. सकाळी साडेनऊ ते दुपारी तीन पर्यंत सुमारे ३५ छोट्या मोठ्या कलाकारांनी गणेशाच्या मुर्ती सुबकरीत्या साकारल्या.

याकरता सुनील खेडेकर, प्रा. सौ. सोनाली खर्चे यांनी प्रतिवर्षीप्रमाणे संतोष केतकर यांना मोलाची मदत केली. बापूसाहेब काणे यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना नाश्ता दिला. दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व गणेश मूर्ती साकारून त्या माधवबाग बेंदरकर आळी चिपळूण येथे सुकण्यासाठी ठेवून देण्यात आल्या. रविवार दि. ३ ऑगस्ट रोजी पुन्हा हे सर्व प्रशिक्षणार्थी सकाळी ९.३० वाजता एकत्र जमले व त्यादिवशी संतोष केतकर, सुनील खेडेकर, सौ. सोनाली खर्चे यांचे मार्गदर्शनाखाली सदर मूर्तींचे रंगकाम करण्यात आले. सर्व छोट्या-मोठ्या कलाकारांनी या सर्व मूर्ती सुबकरीत्या रंगवून संतोष केतकर यांच्या मार्गदर्शनाखाली आखणीचे काम केले.

या कार्यशाळेसाठी लागणारी शाडूची माती चिपळूणचे दानशूर मूर्तिकार राजन लवेकर यांनी विनामूल्य उपलब्ध करून दिली. आनंद पाटणकर यांनीही रविवार दि. ३ ऑगस्ट रोजी सर्वांना नाश्ता दिला. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी संस्कार भारतीचे अभय खांडेकर, श्रीमती विभावरी रजपूत, श्रीकांत फाटक, मंदार ओक, सौ. वीणा परांजपे, सौ. सुखदा परांजपे तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे बापू काणे यांनी खूप मदत आणि मेहनत केली. संस्कारभारतीतर्फे गेले २० वर्षे हा उपक्रम चिपळूणमध्ये सुरु आहे.