चिपळूण शहरावर आता सीसीटीव्हीची नजर

 महत्त्वाच्या ठिकाणी यंत्रणा बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण शहरातील सुरक्षाव्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पॉवरहाऊस, देसाई बाजार तसेच शहराच्या इतर गर्दीच्या व संवेदनशील भागांमध्ये प्रशासनाकडून या आधुनिक यंत्रणा कार्यान्वित केल्या जात आहेत.
या योजनेमुळे रस्ते अपघात, चोरी, मारामारी किंवा अन्य कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न उद्भवल्यास नेमके कारण स्पष्टपणे समोर येऊ शकतील. तसेच, नागरिकांच्या सुरक्षेचा दर्जा वाढण्यास मदत होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे महामार्गावरील काही ठिकाणी वारंवार अपघात होतात, अशा ठिकाणी सीसीटीव्हीची नजर असल्याने घटनांची वेळ, कारण व जबाबदार व्यक्ती ओळखणे सोपे होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. शहरातील सुरक्षाव्यवस्था अधिक चोख होण्यासाठी हे पाऊल टाकण्यात आले असून, भविष्यात या कॅमेऱ्यांचे एकत्रित नियंत्रण कक्ष तयार करून ‘स्मार्ट मॉनिटरिंग’ प्रणालीही राबवण्यात येणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. या उपक्रमामुळे चिपळूण शहर अधिक सुरक्षित आणि कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणांसाठी अधिक सक्षम बनणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.