वाशिष्ठी पुलावरील खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

काँक्रिटीकरण करून खड्डे भरताना एकेरी वाहतूक सुरू

चिपळूण (वार्ताहर) : गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक वाढणार आहे. मात्र, सद्यस्थितीमध्ये रस्ते खड्डेमय झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावरील बहादुरशेख वशिष्ठीच्या पुलावर पडलेले खड्डे तातडीने भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करून पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे.

मुंबई गोवा महामार्गावर सर्वत्र खड्डे पहावयास मिळतात. त्यामुळे खड्डे चुकविताना पावसातून खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने महामार्गावर अनेक अपघात होत आहेत. जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. अशीच परिस्थिती वाशिष्ठी पूल चिपळूण बहादुरशेख येथे झाली होती. याबाबतचा एक व्हिडिओ चिराग मोरे या युवकाने सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्या व्हिडिओमधून सत्य परिस्थितीचे दर्शन झाले. त्यातच गणेश उत्सव तोंडावर आला आहे. वाहतूक निश्चितच वाढणार आहे. त्यामुळे बांधकाम खात्याने वाशिष्ठी पुलावरील खड्डे सिमेंट काँक्रिटीकरण करून भरले आहेत. त्यामुळे एका पुलावरून वाहतूक सुरू ठेवली आहे. अजूनही अनेक ठिकाणी खड्डे पडले असून चाकरमानी यांना सुखकर प्रवास करता यावा यासाठी असेच खड्डे भरले पाहिजेत.