चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील टेरव येथील बौद्धवाडी परिसरात राजेश कदम यांच्या घराजवळ बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजेश कदम यांच्या घराजवळ बिबट्याचा वावर असल्याचे छायाचित्रात स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे बौद्धवाडी परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या घटनेची चिपळूण वनविभागाने तातडीने दखल घेऊन परिसराची पाहणी करावी, बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी टेरवचे सरपंच किशोर कदम यांनी केली आहे. बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात नागरिकांनी रात्रीच्यावेळी विशेष काळजी घ्यावी आणि वनविभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.













