प्रवासी थोडक्यात बचावले
खेड (राकेश कोळी) | मुंबईहून मालवणच्या दिशेने गणेशभक्तांना घेऊन जाणाऱ्या एका लक्झरी बसला रविवारी 24 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 2:10 वाजता कशेडी बोगद्याच्या सुरुवातीस असणाऱ्या पुलावर अचानक आग लागली. प्रवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गाडीचा टायर फुटल्याने ही आग लागली. या घटनेनंतर क्षणातच ज्वाळांनी संपूर्ण बसला वेढा घातला आणि आगीचा भडका उडाला. चालकाने प्रसंगसंवधानता राखून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या दुर्घटनेनंतर मुंबई–गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या दुर्घटनेत MH 02 FG 2121 क्रमांकाची खासगी आराम बस पूर्णपणे जळून खाक झाली असून प्रवाशांचे साहित्य देखील आगीत भस्मसात झाले. ही बस ओमकार मागले यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर येत असून ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती पोलीस घेत आहेत.
आग लागल्याची माहिती मिळताच खेड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. फायरमन शाम देवळेकर, दिपक देवळेकर, वाहनचालक गजानन जाधव तसेच सहाय्यक फायरमन जयेश पवार, प्रणय रसाळ आणि सुरज शिगवण यांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. गौरी–गणपतीसाठी कोकणात दाखल होणाऱ्या गणेशभक्तांच्या प्रवासादरम्यान घडलेली ही घटना भाविकांसाठी धक्कादायक ठरली. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप बचावले असले तरी बस जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.












