राजापूर न. प. च्या नव्या प्रभाग रचनेत एकाच वाडीचे तीन प्रभागात विभाजन

दिवटेवाडीतील नगरीकांची प्रभाग रचनेला हरकत

राजापूर| प्रतिनिधी: राजापूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आली असून या प्रारूप प्रभाग रचनेत दिवटेवाडीचे तीन प्रभागात विभाजन करण्यात आले आहे. यामध्ये दिवटेवाडीचा काही भाग प्रभाग क्र.१० मध्ये समाविष्ठ करण्यात आला आहे. मात्र दिवटेवाडीचा व प्रभाग क्र. १० यामध्ये अर्जुना नदी असून या वाडीपासून प्रभाग क्र.१० मधील मतदान केंद्र अडीच ते तीन किलोमीटर लांब आहे. त्यामुळे दिवटेवाडी येथील नागरिकांनी या प्रभाग रचनेच्या विरोधात हरकत दाखल केली आहे.

दि.१० जून २०२५ चे आदेशानुसार प्रभागांची सरासरी लोकसंख्या ही त्या प्रभागाच्या सरासरी लोकसंख्येच्या १० टक्क्या पेक्षा कमी किंवा १० टक्क्या पेक्षा जास्त मर्यादेत ठेवणे आवश्यक आहे. राजापूर नगर परिषदेच्या सन २०११ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या ९,७५३ इतकी असून, प्रत्येक प्रभागाची सरासरी लोकसंख्या ही ९७५ इतकी किंवा ९७५ पेक्षा १० टक्के अधिक म्हणजे १०७२ किंवा ९७५ च्या १० टक्के पेक्षा कमी म्हणजे ८७८ इतकी असणे आवश्यक आहे. परंतू प्रभाग क्र.१० ची लोकसंख्या ही १११९ इतकी असून प्रभागाच्या सरासरी लोकसंख्येच्या १० टक्केपेक्षा जास्त आहे.

त्यामुळे सदरची प्रभाग रचना ही नगर विकास विभाग यांच्या प्रभाग रचना करण्याच्या तत्वांचा भंग करणारी आहे. तसेच प्रभाग रचना करताना प्रभागाच्या सीमारेषा, मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या-नाले, डोंगर, रेल्वे, रुळ, फ्लायओव्हर इत्यादी नैसर्गिक मर्यादा विचारात घेऊन निश्चित करावे, असे नमूद करण्यात आलेले आहे. परंतू प्रभाग क्र.०९ मधील दिवटेवाडीचा काही भाग हा कोंढेतड या प्रभाग क्र.१० मध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. परंतू प्रभाग क्र. १० व प्रभाग क्र.०९ यामध्ये अर्जना नदी असून, सदर नदीमुळे दिवटेवाडीचा काही भाग व प्रभाग क्र.१० मधील समाविष्ट कोढेतड, धोपटेवाडी भागांचे नैसर्गिकरित्या विभाजन होत आहे.

सदर प्रभाग रचनेत प्रभागाची व्याप्ती नमूद करताना अर्जुना सारख्या मोठ्या नदीचा उल्लेख किंवा विचार करण्यात आलेला नाही. तसेच प्रभाग क्र.१० मध्ये नागरिकांचे प्रभागातील दळणवळण विचारात घेण्यात आलेले नाही. प्रभाग क्र. १० करीता निश्चित करण्यात येणारे मतदान केंद्र हे दिवटेवाडी पासून सुमारे २.५० ते ३ किलोमीटर इतके लांब आहे. सदर प्रभाग रचनेत प्रभाग क्र.१० मध्ये समाविष्ट कोंढेतड, धोपटेवाडी पासून दिवटेवाडीचा काही भाग हा भौगोलिक दृष्ट्या लांब असल्याने तसेच दिवटेवाडीच्या काही भागाची मतदार संख्या ही तुलनेने कमी असल्याने सदरचा भाग हा लोक प्रतिनिधीकडून कायमच विकासापासून दुर्लक्षित राहतो.

एकाच वाडीचे वेगवेगळ्या ३ प्रभागात विभाजन

दिवटेवाडी या बाडीचे प्रभाग क्र.०८, ०९ व १० अशा तीन प्रभागात विभाजन करण्यात आलेले आहे. दिवटेवाडी ही वाडी भौगोलिक दृष्या तसेच लोकसंख्येनुसार मोठीवाडी असली तरी सदर वाडीचे विभाजन हे किमान प्रभागात होणे आवश्यक आहे. असे असताना सदर वाडीचे विभाजन हे कमाल प्रभागात करण्यात आलेले आहे. त्यामुळे हरकती दाखल करण्याच्या कालावधीत दिवटेवाडीतील नागरीक सुबोध पवार, रमेश पवार, रामचंद्र पिठलेकर, अशोक तांबे, शिवराज पवार, भूषण आरेकर, स्वप्नज तांबे वैगरे आदींनी राजापूर नगर परिषदेकडे मध्ये हरकत दाखल केली आहे.