चिंदर सडेवाडीतील गोसावी-देवकोडकर वाडीचा सलग दुसऱ्या वर्षी १००% पर्यावरणपूरक गणेशोत्सव!

२९ मातीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना; निर्माल्य संकलनातून खतनिर्मितीचा संकल्प

आचरा प्रतिनिधी
पर्यावरणाचा समतोल राखत निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यासाठी मालवण तालुक्यातील चिंदर सडेवाडी येथील गोसावी वाडी आणि देवकोडकर वाडीतील ग्रामस्थांनी सलग दुसऱ्या वर्षी १०० टक्के पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रेरणादायी उपक्रम राबविला आहे. पारंपरिक पद्धतीने मातीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करून तसेच निर्माल्याचे शास्त्रोक्त संकलन व व्यवस्थापन करून या वाड्यांनी पर्यावरण संवर्धनाचा आदर्श निर्माण केला आहे.

या दोन्ही वाड्यांमध्ये यंदा एकूण २९ मातीच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. गणेशमूर्ती तयार करताना प्लास्टर ऑफ पॅरिस (PoP) तसेच हानिकारक रासायनिक रंगांचा वापर टाळण्यात आला असून, नैसर्गिक व वनस्पतींपासून तयार केलेल्या रंगांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे गणेशमूर्तींच्या विसर्जनानंतर जलस्रोतांचे प्रदूषण कमी करण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे निर्माल्य व्यवस्थापन. गेल्या वर्षी या दोन्ही वाड्यांमधून तब्बल ४० किलो निर्माल्य संकलित करण्यात आले होते. यंदा निर्माल्य जलस्रोतांमध्ये न टाकता त्याचे पद्धतशीर संकलन करून ६० किलो निर्माल्य जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या निर्माल्याचा वापर पर्यावरणपूरक खत तयार करण्यासाठी करण्यात येणार आहे.

या पर्यावरणपूरक उपक्रमात वाडीतील तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच लहान मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. सामूहिक सहभागातून पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक एकजुटीचेही दर्शन घडत आहे. गोसावीवाडीतील तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, “आमच्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरेला पर्यावरण संवर्धनाची जोड देत आम्ही हा उपक्रम पुढे नेत आहोत. पर्यावरणाचे रक्षण करणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. चिंदर सडेवाडीतील गोसावी वाडी आणि देवकोडकर वाडीने सलग दुसऱ्या वर्षी राबविलेला हा १०० टक्के पर्यावरणपूरक गणेशोत्सव इतर गावांसाठी निश्चितच प्रेरणादायी आणि अनुकरणीय पायंडा ठरत आहे.