रत्नागिरी: राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी ‘आभार’ संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना, कोकणची पारंपरिक भजनी आणि नमन कला सातासमुद्रापार नेण्याचे आश्वासन दिले. ‘आभार’ संस्थेने आयोजित केलेल्या वार्षिक ‘रत्नभूषण पुरस्कार’ आणि ‘गुरुगौरव पुरस्कार’ सोहळ्यात ते बोलत होते. ‘आभार’ संस्थेने तयार केलेले महिलांचे नमन सध्या लोकप्रिय होत असल्याबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले.
सोहळ्याच्या वेळी डॉ. सामंत म्हणाले, “आभार संस्थेने मला जो ‘रत्नभूषण पुरस्कार’ दिला, तो महाराष्ट्रातील अनेक पुरस्कारांपेक्षा मला महत्त्वाचा वाटतो, कारण हा माझ्या ‘घरचा’ पुरस्कार आहे. या संस्थेने महाराष्ट्रात पहिल्यांदाच कोकणची सांस्कृतिक कला आणि महिलांचे नमन तयार केले.” त्यांच्या हस्ते ‘आभार’ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला आणि ‘गुरुगौरव पुरस्कार’ही प्रदान करण्यात आला.
डॉ. सामंत यांनी संस्थेचे सचिव श्री. वाघे यांच्या दूरदृष्टीची प्रशंसा केली. ‘एखाद्या सामान्य घरातून आलेला सुपुत्र आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर अशा कला जपतो, तेव्हा मन भरून येते,’ असे ते म्हणाले. ‘आभार’ संस्थेने त्यांच्यासारख्या कार्यकर्त्याचा सत्कार केल्यामुळेच शासनाने नुकतेच कलाकारांना २५,००० रुपये मानधन देण्याचा जीआर काढला, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
हा पुरस्कार सोहळा स्वयंवर मंगल कार्यालयात पार पडला. रत्नागिरीचे साहित्यभूषण कवी श्री. अरुण इंगवले यांच्या हस्ते डॉ. उदय सामंत यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन ‘रत्नभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. याप्रसंगी श्री. अण्णा सामंत, श्री. विनोद हळदवणेकर, डॉ. दिलीप पाखरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सामंत यांच्या हस्ते अनेक वयोवृद्ध भजनी कलाकार आणि महाराष्ट्रातील पहिले महिला नमन सादर करणाऱ्या महिलांचा ‘गुरुगौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये सौ. शैला करंदिकर, श्री. गिरीश विचारे, श्री. विश्वास करगुटकर, श्री. मिलिंद आरेकर बुवा, सौ. प्रेरणा विलणकर, श्रीमती ज्योती कदम, सौ. रेश्मा शिंदे, सौ. पूनम गोळपकर यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. सागर मायगडे, श्री. प्रवीण सावंतदेसाई, श्री. दादा वाडेकर यांच्यासह ‘आभार’ संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. वाघे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात श्री. अरुण इंगवले यांनी डॉ. सामंत यांचा गौरव करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.











