जामसंडेतील गॅरेजला भीषण आग; लाखोंचे नुकसान

जामसंडेतील गॅरेजला भीषण आग; लाखोंचे नुकसान

लक्ष्मीपूजनानंतर काही वेळातच दुर्घटना; ग्रामस्थांच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण

देवगड / प्रतिनिधी

जामसंडे येथील दीपक दत्ताराम लाड यांच्या ‘सद्गुरुकृपा ऑटोमोबाईल’ या गॅरेजला रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. या आगीत संपूर्ण गॅरेजसह आतील साहित्य जळून खाक झाले. स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी आणि नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाच्या मदतीने सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नांदगाव येथील दीपक लाड यांचे जामसंडे हायस्कूलच्या बाजूला ‘सद्गुरुकृपा ऑटोमोबाईल’ या नावाने गॅरेज आहे. रविवारी रात्री लक्ष्मीपूजन केल्यानंतर आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी गॅरेज बंद केले आणि ते नांदगाव येथे जाण्यास निघाले. मात्र, काही वेळातच गॅरेजमधून आगीच्या ज्वाळा आणि मोठ्या प्रमाणात धूर बाहेर येत असल्याचे नजीकच्या दुकानदारांच्या व ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.

गॅरेजला आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. गॅरेजमध्ये पेट्रोलसदृश ज्वलनशील पदार्थ, टायर, बॅटरी तसेच अन्य साहित्य असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. त्यामुळे आग आटोक्यात आणताना मोठे प्रयत्न करावे लागले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. ग्रामस्थ, व्यापारी आणि अग्निशमन दलाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अखेर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.

या दुर्घटनेत गॅरेज मालक दीपक लाड यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच देवगडचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व घटनेची माहिती घेतली.