पिंपळी पुल दुर्घटनेची काँग्रेस जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी केली पाहणी

चिपळूण :
चिपळूण तालुक्यातील दसपटी मार्गावरील पिंपळी नदीवरील पूल कोसळल्यानंतर परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांनी रविवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

या वेळी त्यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पुल कोसळल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांपासून ते शेतकरी व कामगार वर्ग यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषत: गणेशोत्सवाच्या काळात या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्यामुळे चाकरमान्यांना प्रचंड अडचण निर्माण झाली आहे. सोनललक्ष्मी घाग यांनी यावेळी सांगितले की, हा पूल जुना होता आणि अशा प्रकारचे अनेक पूल सध्या नादुरुस्त स्थितीत आहेत. वेळोवेळी दुरुस्ती न झाल्याने अखेर अपघाताच्या स्वरूपात ही घटना घडली. त्यामुळे यापुढे अशा प्रकारचे प्रकार होऊ नयेत यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि स्थानिक आमदार यांनी त्वरित लक्ष घालून पर्यायी मार्ग काढावा, तसेच तातडीने नवीन पूल उभारणीसाठी कार्यवाही सुरू करावी अशी ठाम मागणी त्यांनी केली. या पाहणी दौऱ्यात स्थानिक काँग्रेस पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते