खेड तालुक्यात एसटी सेवा ठप्प, ग्रामीण प्रवाशांचे हाल – गणेशोत्सवी काळात नागरिकांमध्ये संतापाची लाट

खेड – (प्रतिनिधी)
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात लाखो चाकरमानी दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातून शेकडो एसटी बसेस मुंबईकडे धाडण्यात आल्या आहेत. मात्र या निर्णयाचा फटका थेट खेड तालुक्यातील ग्रामीण प्रवाशांना बसला असून, वाडीवस्त्यांमध्ये धावणाऱ्या शेकडो नियमित फेऱ्या रद्द झाल्या आहेत. परिणामी ग्रामीण भागातील वाहतूक अक्षरशः ठप्प झाली असून, प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
मुंबईहून चाकरमान्यांना कोकणात आणण्यासाठी एसटी महामंडळाने विशेष बससेवा उपलब्ध करून दिली आहे. मात्र तालुक्यात आल्यानंतर गावात पोहोचण्यासाठी प्रवाशांना पर्यायच नसल्याने नागरिक खेड आगारात तासन्तास अडकून पडले आहेत. “मुंबईहून आणलं, पण गावात सोडलंच नाही, तर लोकांनी काय करायचं?” असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे. काही प्रवाशांनी खाजगी वाहनांचा आधार घेतला असला तरी त्यासाठी दुप्पट-तिप्पट भाडं मोजावं लागत असल्याची तक्रार करण्यात आली.
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी नोकरी, शिक्षण आणि दैनंदिन कामांसाठी एसटी प्रवास महत्त्वाचा आधार आहे. पण बसफेऱ्या रद्द झाल्याने विद्यार्थ्यांपासून कामगारांपर्यंत सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. खेड आगार परिसरात गुरुवारी दिवसभर प्रवाशांचा गोंधळ पाहायला मिळाला. अनेकांनी संताप व्यक्त करत एसटी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.
नागरिकांनी मागणी केली आहे की, गणेशोत्सव काळात जरी चाकरमान्यांच्या सोयीसाठी विशेष बसेस मुंबईकडे धाडल्या जात असल्या तरी ग्रामीण भागातील किमान आवश्यक फेऱ्या कायम ठेवाव्यात. अन्यथा पुढील काही दिवसांत प्रवाशांचा उद्रेक अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.