BREAKING : १० हजारांची लाच घेताना चाफे ग्राम महसूल अधिकाऱ्यास रंगेहाथ अटक

नव वर्षाच्या पहिल्या दिवशीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा दणका

रत्नागिरी : ७/१२ उताऱ्यात फेरफार करून नाव नोंद करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी रत्नागिरी तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी बजरंग दत्तात्रय चव्हाण याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई १ जानेवारी २०२६ रोजी रत्नागिरी येथे करण्यात आली आहे.

तक्रारदार यांनी रत्नागिरी तालुक्यातील आगरनरळ परिसरातील १० गुंठे बिगरशेती क्षेत्र खरेदी केले होते. सदर खरेदी केलेल्या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यात फेरफार करून स्वतःचे नाव नोंद करण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालयात अर्ज सादर केला होता. मात्र अर्ज मंजूर करून ७/१२ उतारा व फेरफाराची प्रत देण्यासाठी संबंधित तलाठ्याने तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांच्याकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी करण्यात आल्यानंतर सापळा रचण्यात आला. १ जानेवारी २०२६ रोजी ठरलेल्या ठिकाणी तलाठ्याने तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताच ACB पथकाने त्यांना पंचांसमक्ष रंगेहाथ अटक केली.

या कारवाईत ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) बजरंग दत्तात्रय चव्हाण (वय ५१, रा. रत्नागिरी) यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. सदर सापळा कारवाई पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सहाय्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कामासाठी लाच मागत असल्यास त्वरित टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा रत्नागिरी ACB कार्यालयाशी संपर्क साधावा.