खेड – ( प्रतिनिधी )
शनिवार दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी इजिएन इंडिया स्टडी ॲण्ड लर्न तर्फे रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल मॅडम यांना ’उत्कृष्ट नेतृत्व पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
रोटरी स्कूलचे उत्कृष्ट नेतृत्व, दमदार कामगिरी व उज्ज्वल निकालाची परंपरा यामुळे रोटरी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता जयेश पटेल मॅडम यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन उत्कृष्ट नेतृत्व पुरस्काराने गौरविण्यात आले.
जी व्यक्ती संघर्ष करण्यास घाबरत नाही अशा व्यक्ती कोणत्याही आव्हानांकडे संकट नव्हे तर संधी म्हणून बघतात. आलेल्या संधीचे सोने करतात. असंच एक संघर्षातून कणखर बनलेलं प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व म्हणजे रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता जयेश पटेल मॅडम. खेडमध्ये वास्तव्यास आल्यानंतरचा प्रत्येक दिवस हा त्यांच्यासाठी एक आव्हानच होता. मात्र तल्लख बुध्दीमत्ता व कष्ट करण्याची तयारी आणि शिकण्याची असलेली आवड या बळावर त्या 2007 साली रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडमध्ये रुजू झाल्या. प्रसन्न हास्य सर्वांना समजून घेण्याची वृत्ती याबरोबरच विविध शैक्षणिक उपक्रमांमुळे अल्पावधीतच त्या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाल्या. अध्यापनाचे कार्य करत असताना त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण करून त्या रोटरी शाळेच्या मुख्याध्यापक या पदाची धुरा त्या सांभाळत आहेत. शाळेचा उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या प्रगतीचा आलेख उंचवायचा होता. मात्र त्या कधीही डगमगल्या नाहीत. कामाचे स्वरूप समजून घेऊन त्यांनी जबाबदारीचे विकेंद्रीकरण केले. शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांमध्ये समन्वय साधून शाळेचा विकास साधला. परिणामी रोटरी शाळेचे नाव आज देशपातळीवर झळकत आहे. आजवर रोटरी स्कूलने घेतलेली यशस्वी झेप यामागे मुख्याध्यापिका सौ. भूमिता जयेश पटेल मॅडम यांची क्रियाशीलता अतिशय महत्त्वपूर्ण ठरते.
इजिएन इंडिया स्टडी ॲण्ड लर्न तर्फे रोटरी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल मॅडम यांना उत्कृष्ट नेतृत्व पुरस्काराने गौरविण्यात आले, ही आनंदाची बातमी कळताच सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, रोटरी प्रतिष्ठानचे सेक्रेटरी रो. पराग चिखले, सर्व पदाधिकारी, शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल मॅडम यांचे अभिनंदन केले.











