खेड | प्रतिनिधी :
खेड येथील लायन्स एज्यू सोसायटी संचालित एलटीटी इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा तयारीला चालना देण्यासाठी NEET, JEE, MH-CET तसेच इयत्ता ७ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्सचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. या उपक्रमामुळे खेड शहरासह परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व तज्ज्ञ मार्गदर्शनाची सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे.
या उद्घाटन सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष अहमदभाई मुकादम, वाहिद मुकादम, जयेश गुहागरकर, माजिद खतीब, समन्वयक जॉय सर, एलसी मॅडम, मुख्याध्यापक सारंग सर, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक सारंग सर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष अहमदभाई मुकादम यांच्या हस्ते फित कापून कोर्सचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना समन्वयक जॉय सर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करता यावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि योग्य दिशा मिळावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यासाठी अनुभवी व तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून विद्यार्थ्यांना नियमित, दर्जेदार आणि परिणामकारक प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे एलटीटी विद्यालयातील तसेच खेड शहर व परिसरातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षांची तयारी लवकर सुरू करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. अशा प्रकारचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कोर्सेसमध्ये प्रवेश व अधिक माहितीसाठी इच्छुक पालक आणि विद्यार्थ्यांनी एलटीटी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.












