चिपळुणात भाजप ग्रामीण व शहर मंडलतर्फे प्रशांत यादव यांचा शानदार सत्कार सोहळा
चिपळूण : मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला सन्मानपूर्वक भाजपमध्ये प्रवेश दिला. त्यामुळे माझी जबाबदारी अधिक वाढली आहे. ही जबाबदारी पार पाडताना केवळ चिपळूण नव्हे, तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात भाजप कसा वाढेल आणि जिल्हा भाजपमय कसा होईल, यासाठी प्रयत्न करू, असा विश्वास प्रसिद्ध उद्योजक तसेच नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते प्रशांत यादव यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पक्ष ग्रामीण व शहर मंडल चिपळूणतर्फे आज सायंकाळी शहरातील ब्राह्मण सहायक संघाच्या सभागृहात प्रशांत यादव यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. यादव बोलत होते. ते म्हणाले, मी खूप विचारपूर्वक भाजपमध्ये माझ्या सहकाऱ्यांसह प्रवेश केला. हा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. सैन्य जेव्हा मागे असते, तेव्हा सेनापतीला प्रत्येकवेळी दक्ष राहूनच काम करावे लागते. माझ्या पाठी असंख्य लोक होते. त्यांना माझ्या सोबत पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांना दिशा देण्याची गरज होती. एक लढाई हरली म्हणून थांबायचे नसते. आपले सैन्य नव्या प्रवासात पुढे कसे सुखरूप जाईल, याचा विचार करून मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. माझ्या सहकाऱ्यांनीही माझ्यावर विश्वास दाखवला आणि एकजुटीने माझ्या पाठीशी राहण्याचा संकल्प केला. पक्षप्रवेशाच्या दिवशी प्रचंड पाऊस होता. निसर्गाने आमची परीक्षाच घेतली होती. मात्र त्या सगळ्या अडचणींवर मात केली. आमचा मार्ग योग्य होता म्हणून परमेश्वराने आम्हा सगळ्यांना मुंबईपर्यंत सुखरूप पोहचवले आणि आम्ही योग्य ठिकाणी आलोय, याची पोचपावती आम्हाला प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली. आमचे सगळेच सहकारी भाजपमध्ये खांद्याला खांदा लावून काम करतील. आम्ही कार्यकर्ता म्हणून काम करू. आपला कार्यकर्ता सक्षम झाला, तरच आम्ही नेता म्हणून सक्षम होऊ. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांसाठी लढण्याकरिता आपण सगळ्यांनी मेहनत घेऊया. त्यासाठी जी ताकद लागेल, ती आम्ही पक्षाच्या आणि आमच्या वैयक्तिक पातळीवर उभी करू, असेही यावेळी श्री. यादव यांनी आश्वस्त केले.
यावेळी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी श्री. यादव यांच्या सहकार व दुग्धक्षेत्रातील कार्याचा गौरव केला. वाशिष्ठीच्या डेअरीच्या माध्यमातून श्री. यादव यांनी रोजगाराचे जाळे उभे उभे केले आहे. श्री. यादव यांनी त्यांचे हे कार्य अविरत सुरू ठेवावे. संपूर्ण जिल्ह्यात व्याप्ती वाढवावी. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्या पाठीशी उभा राहील, अशी ग्वाहीही यावेळी श्री. सावंत यांनी दिली. प्रशांत यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे पक्षाला सर्वागीण ताकद मिळणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप संपूर्ण जिल्ह्यात एक नंबरला असेल, असा विश्वासही श्री. सावंत यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, जिल्हा सरचिटणीस अमित केतकर, तालुकाध्यक्ष विनोद भुरण, शहराध्यक्ष शशिकांत मोदी, महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष शीतल रानडे, माजी नगरसेवक विजय चितळे, माजी जिल्हा उपाध्यक्ष रामदास राणे, माजी नगरसेविका रसिका देवळेकर, युवा मोर्चाचे जिल्हा पदाधिकारी मंदार खांडकर, प्रशांत यादव यांचे समर्थक व जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराव देसाई, बळीराम मोरे, अन्वर जबले, ॲड्. सौ. नयना पवार, नॅबचे अध्यक्ष नीलेश भुरण, चिपळूण तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष योगेश शिर्के उपस्थित होते. तसेच भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह प्रशांत यादव यांचे असंख्य समर्थक या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते.













