जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे यांचा उपक्रम
सावंतवाडी: गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला भाजप युवा नेते आणि माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांच्या पुढाकाराने सावंतवाडी आणि आंबोली मंडळातील ५० भजनी मंडळांना भजनी साहित्याचे वाटप करण्यात आले. सांस्कृतिक चळवळ जपण्यासाठी आणि भजनी मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमांतर्गत सावंतवाडी शहर आणि आंबोली मंडलातील एकूण ५० मंडळांना साहित्य देण्यात आले. या वेळी आयोजित कार्यक्रमाला भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे, आंबोली मंडलाचे अध्यक्ष संतोष राऊळ, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगांवकर, खरेदी-विक्री संघ तालुकाध्यक्ष प्रमोद गावडे, माजी सभापती पंकज पेडणेकर, माजी नगरसेवक ॲड. परिमल नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ राऊळ, गेळे गावचे सरपंच सागर ढोकरे यांच्यासह विविध भजनी मंडळांचे सदस्य उपस्थित होते.
या उपक्रमामुळे भजनी मंडळांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक कला आणि संस्कृतीला चालना देण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचे दिसून आले.












