नाटे सागरी पोलीसांची कार्यतत्परता.. महिलेच्या तक्रारीबाबत अवघ्या ४८ तासात दाखल केले दोषारोपपत्र

जैतापूर (वार्ताहर): राजापूर तालुक्यातील आडीवरे वाडापेठ येथे घडलेल्या एका गुन्ह्यात नाटे सागरी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करून दाखवलेली कार्यतत्परता कौतुकास्पद ठरली आहे. महिलेला लज्जा उत्पन्न होईल अशा शिवीगाळ व वर्तन करणाऱ्या आरोपीविरुद्ध इतक्या कमी वेळेत कठोर कारवाई करून पोलिसांनी महिलांच्या सुरक्षिततेबाबत घेतलेली दखल व केलेली कार्यवाही यामुळे पोलीसांच्या कार्यपध्दती बाबत समाधान व्यक्त होत आहे.

दिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी संबंधित महिलेबाबत आरोपीने अश्लील वर्तन व शिवीगाळ केली. पीडितेच्या तक्रारीवरून नाटे सागरी पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. महिलांच्या सन्मानाशी संबंधित गुन्ह्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी विलंब न लावता तपास सुरू केला.

या कारवाईत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांनी स्पष्ट सूचना देऊन तपास वेगाने पार पाडण्यावर भर दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाटे सागरी पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी तपास पथकाला जबाबदारी दिली.

बीट हवालदार एस. एस. इंगळे यांनी तत्परतेने पंचनामा करून आवश्यक पुरावे गोळा केले. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, पोलीस हवालदार हुजरे यांच्यासह संपूर्ण तपास पथकाने एकत्रितपणे काम करत आरोपीस ताब्यात घेऊन ४८ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या या जलद व ठोस कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे. महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांकडे पोलिसांकडून किती गांभीर्याने पाहिले जाते, याचे हे ठळक उदाहरण ठरले आहे. स्थानिक नागरिकांकडून या कामगिरीचे मनापासून कौतुक होत असून, ही कारवाई इतर गुन्हेगारांसाठी धडा ठरेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.