बाल कलाकारांनी शाडुतून साकारल्या पर्यावरण पुरक गणेश मुर्ती

राजापूर नगर परिषद आयोजित पर्यावरण पुरक गणपती कार्यशाळेत शाडु मुर्ती पासून गणेश मुर्त्या बनविताना मुले.
राजापूर नगर परिषद आयोजित कार्यशाळा

राजापूर (वार्ताहर): पर्यावरणाचे जतन अन संवर्धन व्हावे यादृष्टीने समाजामध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने राजापूर नगर पालिकेतर्फे माझी वसुंधरा अभियानांतर्गंत पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमुर्ती बनविण्याची कार्यशाळा नुकतीच पार पडली. या उपक्रमामध्ये शहरातील सहभागी शाळांमधील अनेक बालकलाकारांनी काही मिनिटांच्या कालावधीमध्ये हस्तकौशल्याच्या जोरावर शाडूच्या मातीला आकार देत हुबेहुब गणपती तयार करून आपल्यातील दडलेल्या कलाकाराची प्रचिती दिली.

नगर परिषद पिकअपशेडच्या सभागृहामध्ये पालिकेचे मुख्याधिकारी श्री. बाबर, कार्यालयीन अधिक्षक जितेंद्र जाधव, यांत्रिकी आणि पर्यावरण विभागाच्या कनिष्ठ अभियंता सुप्रिया पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत मराठे, प्रकाश नाचणेकर, गोखले कन्याशाळेतील उपक्रमशील शिक्षक सुहास काडगे, आरोग्य निरिक्षक अमित पवार, संदेश जाधव, दिवाकर खडपे यांच्यासह मोठ्यासंख्येने मुले उपस्थित होती.

शाडूच्या मुर्त्या साकारून त्याद्वारे पर्यावरणाचा संदेश जावा या उद्देशाने झालेल्या या कार्यशाळेमध्ये प्रसिद्ध मुर्तीकार राहुल तायशेट्ये यांनी शाडूच्या मातीपासून मुर्त्या कशा घडवाव्यात यासंबंधित कार्यशाळेमध्ये सहभागी मुलांना मार्गदर्शन केले. तर, यांत्रिकी आणि पर्यावरण विभागाच्या कनिष्ठ अभियंता सुप्रिया पोतदार, शिक्षक सुहास काडगे यांनी पर्यावरणचे जतन अन् सवंर्धनाचे महत्व यासंबंधित मार्गदर्शन केले. त्यानंतर, श्री. तायशेट्ये यांच्या सहकार्याने नगर परिषदेने उपलब्ध करून दिलेल्या शाडूच्या मातीपासून काही मिनिटाच्या कालावधीमध्ये मुलांनी अनेक हुबेहुब गणपतींच्या मुर्त्या तयार केल्या. अनेकवेळा स्थिर न बसणारी ही मुले सुमारे अर्धा-एक तास मन लावून एकाग्रचित्ताने एका जागी ठाण मांडून गणेशाच्या मुर्त्या तयार करतानाचे चित्र या ठिकाणी दिसत होते. शाडूच्या मातीपासून स्वहस्ते गणेशमुर्त्या घडविण्याच्या या मुलांच्या अंगभूत कौशल्याचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून नगर परिषदेने पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून तयार करण्यात आलेल्या गणेशमुर्त्या घरोघरी प्रतिष्ठापीत करण्याचे आवाहन केले. शाडूच्या मातीपासून गणेशमुर्त्या घडविण्याच्या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या मुलांनी तयार केलेल्या मुर्त्या घरी नेल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाकडून देण्यात आल्या.