सावंतवाडी । प्रतिनिधी : वर्षभर वाट पाहिल्यानंतर भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी मोठ्या उत्साहात लाडक्या गणरायाचं घरोघरी आगमन झालं होतं. बाप्पाच्या आगमनाने संपूर्ण सावंतवाडीमध्ये एक उत्साहाचं आणि भक्तीमय वातावरण तयार झालं होतं. आज, दीड दिवसांच्या गणपतीला भक्तिपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.
’गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषाने मोती तलावाचा परिसर दुमदुमून गेला होता. गुरुवारच्या सायंकाळी सुरू झालेलं गणेशमूर्तींचं विसर्जन रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. यावेळी, सावंतवाडीच्या राजघराण्यातील गणपतीचंही राजघराण्यातील सदस्यांच्या उपस्थितीत विसर्जन करण्यात आलं. राजवाडा आणि राजश्री तिसरे खेमसावंत यांच्या माठ्यातील गणपतीला वाजत-गाजत मिरवणूक काढून निरोप देण्यात आला. यावेळी राजेसाहेब खेमसावंत भोसले, राणीसाहेब शुभदादेवी भोसले यांच्यासह अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आणि गणेशभक्त उपस्थित होते.
ग्रामीण भागातही दीड दिवसांच्या गणेशाला ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असं वचन देऊन जड अंत:करणाने निरोप देण्यात आला. गावागावातील नद्या, तलाव आणि पाणवठ्यांवर मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. यावेळच्या मिरवणुकीत भजन, आरती आणि फटाक्यांच्या आवाजाने परिसर भारलेला होता.
शहरात विसर्जनस्थळी नगरपालिकेद्वारे खास व्यवस्था करण्यात आली होती. गणेशभक्तांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी पोलिसांचाही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बाप्पाला निरोप देताना अनेक गणेशभक्तांचे डोळे पाणावले होते. भक्तिमय आणि भावूक वातावरणात गणपतीला निरोप देण्यात आला.













