UPDATE: जगबुडी नदीत बुडालेल्या युवकाचा शोध पुन्हा सुरू, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

खेड (राकेश कोळी): खेड तालुक्यातील भोस्ते-अलसुरे गावांच्या सीमेवर दीड दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी एक भीषण अपघात झाला. जगबुडी नदीच्या प्रखर प्रवाहात बुडालेल्या ४० वर्षीय मंगेश पाटील यांचा शोध घेण्यासाठी शुक्रवारी सकाळी पुन्हा मोहीम सुरू करण्यात आली आहे. या घटनेचा हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ही दुर्दैवी घटना गुरुवारी सायंकाळी घडली. भोस्ते गावातील पाटीलवाडी येथील मंगेश पाटील हे आपल्यासोबतच्या आणखी एका युवकासह गणपती विसर्जनासाठी जगबुडी नदीवर गेले होते. विसर्जनानंतर दोघेही नदीच्या प्रवाहात अडकले. सोबतच्या तरुणाने कसेतरी पोहत किनारा गाठला, पण मंगेश पाटील यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले.

मंगेश पाटील यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. यंदाच त्यांच्या घरी नवसाचा गणपती आणला होता. मात्र विसर्जनाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शोधकार्य पुन्हा सुरू, एनडीआरएफचे पथक दाखल

गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मंगेश पाटील यांचा शोध घेण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र अंधारामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी पुन्हा शोधमोहिमेला सुरुवात झाली आहे. चिपळूण येथील एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) चे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, ते शोधकार्य करत आहेत. मात्र नदीच्या जोरदार प्रवाहामुळे हे काम अत्यंत कठीण ठरत आहे.

दरम्यान, या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नदीच्या दुसऱ्या बाजूला मासेमारी करण्यासाठी गेलेल्या काही तरुणांनी हा व्हिडिओ शूट केला असून, त्यात नदीत बुडण्यापूर्वीच्या क्षणांचा थरार कैद झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.