बौद्धिक, सामाजिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी वाचन खूप आवश्यक- आ. शेखर निकम

भारतरत्न डॉ. आंबेडकर वाचनालयाचा रौप्यमहोत्सव ‘शब्द माझा मृदंगी’ विशेषांकाचे प्रकाशन

चिपळूण (प्रतिनिधी) : बौद्धिक, सामाजिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी वाचन करणे खूप आवश्यक आहे. आपण चरित्रे वाचायला हवीत, त्यातील संघर्षातून व्यक्तिमत्त्वे उभी राहिलेली व्यक्तिमत्त्वे प्रेरणा देतात. आज मुळात वाचन कमी झालेले असताना, ए.आय. तंत्रज्ञान शाळेपासून हवंय का? अशा मुद्द्यांचा विचार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आ. शेखर निकम यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या रौप्य महोत्सवी सांगता समारंभात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष उमेश सकपाळ, मुख्याधिकारी संजय जाधव, नगरसेवक निहार कोवळे, विकी नरळकर, शशिकांत मोदी, मार्गदर्शक प्रकाश देशपांडे, ‘लोटिस्मा’चे अध्यक्ष डॉ यतीन जाधव, डॉ. आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, कार्याध्यक्ष सुनिल खेडेकर, कार्यवाह सुमेध करमरकर होते. आ. निकम पुढे म्हणाले, स्व. गोविंदराव निकम यांनी पूर्वी ‘गाव तिथे वाचनालय’ अशी संकल्पना राबवली होती. जगण्याचा आनंद मिळेल असा छंद जोपासण्याचे आवाहन निकम यांनी केले. शालेयस्तरापासून वाचन आवश्यक आहे. देशातील स्पर्धा परीक्षेत बिहारची मुलं चमकतात कारण तिथे लहानपणापासून मुलांना स्पर्धा परीक्षासाठी तयार केले जाते असेही ते म्हणाले.
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी कै. रमेश चिपळूणकर (गुरुजी) यांच्या माध्यमातून वाचनालयाला भेट दिल्याची आठवण सांगितली. वाचनालयाला लागणारे सर्वतोपरी सहकार्य नगरपरिषदेसह वैयक्तिक माध्यमातून करणार असल्याचे ते म्हणाले. विद्यार्थीनी अनन्या खेराडे हिने स्वागत गीत सादर केलं. प्रास्ताविकातून प्रदीप पवार यांनी रौप्यमहोत्सवी कार्यक्रमांचा आढावा घेतला. विशेषांक विषयक निवेदन संपादक धीरज वाटेकर यांनी केले. त्यांनी ‘वाचनालयांचे भवितव्य’ अनुषंगाने विशेषांकातील संदर्भीय मजकुराचा आढावा घेतला. राष्ट्रपाल सावंत यांनी वाचनालयाच्या उभारणीतील टप्प्यांचा आढावा घेतला. डॉ. यतिन जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. धनंजय चितळे यांनी, मुलं वाचत नाहीत कारण त्यांना वाचणारे आई-बाबा दिसत नसल्याची खंत व्यक्त करून आपण अधिकाधिक संख्येने वाचनालयाचे सदस्य होण्याची आवश्यकता बोलून दाखवली. कार्यक्रमाची सुरुवात, नगराध्यक्ष सकपाळ यांच्याहस्ते ग्रंथ प्रदर्शन उद्घाटनाने आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. सूत्रसंचालन अमित ओक यांनी तर आभार प्राची जोशी यांनी मानले.