संगलट गावात बिबट्याचा संचार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Portrait of leopard in the wild on safari track. Shot in Tadoba Tiger Reserve.

खेड (रत्नागिरी) – खेड तालुक्यातील खडीपट्टा विभागातील संगलट गावात बिबट्या मुक्तपणे फिरताना दिसून आल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खेड शहरातील प्रसिद्ध व्यापारी रहीम सहिबोल यांच्या संगलट मोहल्यातील निवासस्थानाबाहेर रात्रीच्या वेळी बिबट्या फिरताना दिसला. विशेष म्हणजे, घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्याच्या हालचाली स्पष्टपणे कैद झाल्या असून हा व्हिडिओ आता गावभर चर्चेचा विषय ठरला आहे.
या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. विशेषतः लहान मुले व वृद्ध यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. गावातील अनेक लोक रात्री उशिरा कामावरून परततात तसेच घराबाहेर जनावरे बांधलेली असतात. त्यामुळे बिबट्याच्या उपस्थितीमुळे केवळ नागरिकांच्याच नव्हे, तर जनावरांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांनी वनविभागाला तातडीने कारवाई करून बिबट्याला पकडण्याची मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून खेड तालुक्यातील डोंगराळ भागात वन्यप्राण्यांच्या हालचाली वाढल्याची चर्चा सुरू असून त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक अधिकच धास्तावले आहेत. संगलट गावातील या घटनेमुळे संपूर्ण खेड तालुक्यात भीतीचे सावट पसरले आहे.