कलंबिस्त हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त हायस्कूलमधील १९९२-९३ च्या दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी एक अभिनव आणि स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. त्यांनी ‘पदवी ते उच्च शिक्षण विद्यार्थी दत्तक योजना’ जाहीर केली आहे. या योजनेनुसार, आर्थिक अडचणींमुळे शिक्षण पुढे सुरू ठेवू न शकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन, त्यांच्या पदवी आणि उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे.
या उपक्रमाची घोषणा करताना माजी विद्यार्थी आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव, ॲड. संतोष सावंत म्हणाले की, या बॅचमधील अनेक विद्यार्थी आज विविध मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून कलंबिस्त परिसरातील गरीब विद्यार्थ्यांना ही मदत दिली जाईल.
याच कार्यक्रमादरम्यान, माजी विद्यार्थ्यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद व्यक्त करत, दहावीच्या परीक्षेत उत्तम यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यात शाळेतून प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थिनींना तसेच मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिनींचा रोख रक्कम व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये तनिषा संतोष ठाकर (प्रथम), श्रावणी राजन सावंत (द्वितीय), मानसी दशरथ सावंत (तृतीय) आणि हर्षा एकनाथ राऊळ (मराठीत सर्वाधिक गुण) यांचा समावेश होता. मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
माजी विद्यार्थ्यांचा सहभाग शाळेच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा
यावेळी बोलताना मुख्याध्यापक अभिजीत जाधव यांनी माजी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाची प्रशंसा केली. ते म्हणाले, “शाळेचा १००% निकाल पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने लागत असला, तरी माजी विद्यार्थ्यांनी सुरू केलेला हा उपक्रम खरंच कौतुकास्पद आहे. यामुळे गावाच्या शैक्षणिक विकासाला मोठी मदत मिळेल.”
या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी दोन पंख्यांचीही भेट दिली. तसेच, शाळेचे वरिष्ठ लिपिक विष्णू पास्ते यांचा त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल सत्कार करण्यात आला. या वेळी काशिनाथ महडगूत, रवींद्र जंगम, रवी कमल सावंत, अर्चना सावंत यांसह १९९२-९३ बॅचचे अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते.












