मोती तलावातील मगर पुन्हा ‘जैसे थे’

वनविभागाने लावलेला सापळा ठरला निष्फळ 

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक मोती तलावातील मगर पुन्हा एकदा दृष्टीस पडली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना वनविभागाने मगरीला पकडण्यासाठी लावलेला सापळा निष्फळ ठरला आहे. ही मगर पुन्हा त्याच संगीत कारंजावर आल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त करत वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून ही मगर तलावात दिसल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने मगरीला पकडण्यासाठी सापळा लावला होता, परंतु त्यात यश आले नाही. रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मगरीने पुन्हा एकदा संगीत कारंज्यावर येऊन दर्शन दिले.

काही दिवसांपूर्वी वनविभागाच्या जलद कृती दलाने बोटीच्या मदतीने तलावाची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांना मगरीचे अस्तित्व आढळले नव्हते. मात्र, आज पुन्हा ती दिसल्याने तिचे वास्तव्य मोती तलावातच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गणेशोत्सवापूर्वी तातडीच्या उपाययोजनांची मागणी

गणेशोत्सव जवळ आला असून शहरातील बहुतांश गणपतींचे विसर्जन मोती तलावातच केले जाते. अशावेळी या मगरीमुळे कोणालाही धोका पोहोचू नये यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. या मगरीला त्वरित पकडून नैसर्गिक अधिवासात सोडावे, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.