गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत ‘मिशन ऑल आऊट’

पटवर्धन चौकातील अवैध पार्किंगवर कारवाई; दिवसभरात १५ हजारांचा दंड वसूल

कणकवली : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी आणि गणेशोत्सव काळात होणारी गर्दी लक्षात घेता कणकवली पोलिसांकडून ‘मिशन ऑल आऊट’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांच्या सूचनेनुसार कणकवली पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष कारवाई करण्यात येत आहे.

या मोहिमेअंतर्गत गंगोमंदिर नाका येथे पोलिसांकडून नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. वाहनचालकांकडून होणारे वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी पोलिसांकडून विशेष लक्ष दिले जात आहे. अवैध पार्किंग, वाहन चालविताना मोबाईलवर संभाषण करणे, वाहन परवाना नसणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे तसेच ट्रिपल सीट वाहन चालविणे अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

दरम्यान, कणकवली शहरातील मुख्य पटवर्धन चौक परिसरातही अवैध पार्किंगविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत आज दिवसभरात तब्बल १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गणेशोत्सवासाठी शहरात मोठ्या संख्येने नागरिक व गणेशभक्त दाखल होत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून शहरातील प्रमुख मार्ग व चौकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

‘मिशन ऑल आऊट’ मोहीम सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहणार असून गणेशोत्सव काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासोबतच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यावर पोलिसांचा भर राहणार आहे.

दरम्यान, नागरिकांनी गणेशोत्सव काळात वाहतूक नियमांचे पालन करावे, वाहने रस्त्यावर किंवा वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी पार्क करू नयेत तसेच पोलिसांच्या सूचनांचे पालन करून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र नानसे, पोलीस हेडकॉन्स्टेबल दिलीप पाटील, वाहतूक पोलीस आशिष जाधव, महिला पोलीस अपर्णा होवाळे तसेच पोलीस कॉन्स्टेबल दळवी सहभागी झाले आहेत.